• Sat. Apr 18th, 2026

बाबासाहेबांचा जीवनप्रवास केवळ संघर्ष नसून संपूर्ण समाजाच्या मुक्तीसाठीचा लढा होता -राजेंद्र आंधळे

ByMirror

Apr 17, 2026

सावेडीत महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवात विचारांचा जागर


शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला जयंती सोहळा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास हा केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नसून संपूर्ण समाजाच्या मुक्तीसाठीचा लढा होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले, परदेशात जाऊन उच्च पदव्या मिळवल्या आणि भारताच्या संविधानाची निर्मिती करून देशाला नवा मार्ग दाखविल्याचे प्रतिपादन पाटबंधारे मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र आंधळे यांनी केले.


सावेडी, गुलमोहर रोड येथील आम्रपाली मंगल कार्यालयात महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्यानात मार्गदर्शन करताना आंधळे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व वंदन करून करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा. निवृत्ती आरु, संपर्क प्रमुख सुधाकर जाधव, स्वागताध्यक्ष एन. एम. पवळे, सचिव सी. पी. क्षेत्रे, उपाध्यक्ष पी. पी. खंडागळे, शिरीष जाधव, सहसचिव बी. आर. सातपुते, गिरीष गायकवाड, भिमराव घोडके, राजेंद्र थोरात, डॉ. प्रताप घोडके, इंजि. निखिल आरु, डॉ. अमित पवळे, इंजि. किरण पगारे, अजय साळवे, ॲड. सुबोध जावधे, सतीष राजगुरु, अविनाश भोसले, मनेष कांबळे, अजित घोडेस्वार, डॉ. तुरुकमाने, डॉ. बी. एन. रणनवरे, के. के. जाधव, मार्शल भिंगारदिवे, मनोहर पाटोळे, संजय शिंदे, डॉ. शैलेश खंडागळे, रमेश जगताप, अर्जुन कांबळे, राजु थोरात, विजय पाटोळे आदी उपस्थित होते.


या वेळी पाटबंधारे मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र आंधळे यांनी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांचा बालपणापासूनचा संघर्षमय जीवनप्रवास अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवला. त्यांनी अस्पृश्‍यता, सामाजिक रूढी आणि परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला बाबासाहेबांनी दिलेल्या दिशादर्शक कार्याचा सखोल आढावा घेतला.


आंधळे म्हणाले की, “बाबासाहेबांना वाचनाची गोडी त्यांच्या वडिलांनी लावली. त्याच वाचनाच्या बळावर त्यांनी जगभरातील ज्ञान आत्मसात केले. बुद्ध, धम्म आणि मानवतेच्या मूल्यांचा स्वीकार करून त्यांनी समाजाला समतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांची गरज आजही तितकीच आहे.” तसेच त्यांनी नमूद केले की, कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांचा ‘ज्ञानाचे प्रतीक’ म्हणून पुतळा उभारण्यात आला आहे, यावरून त्यांच्या ज्ञानाचा जागतिक स्तरावर स्वीकार झाल्याचे स्पष्ट होते. जातिव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि भारताच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक ठरत आहे. बाबासाहेबांच्या संघर्षात त्यांच्या अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांचा त्यागही त्यांनी अधोरेखित केला.


प्रा. निवृत्ती आरु यांनी सांगितले की, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज प्रगती करू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.


स्वागताध्यक्ष एन. एम. पवळे म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने महापुरुषांचे विचार आत्मसात करून समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहणे गरजेचे आहे. या जयंती महोत्सवातून आम्ही समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले.


या जयंती सोहळ्यात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थ्यांनी भीम गीत, कविता आणि भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍नमंजुषा स्पर्धा आणि नवोदित कलाकारांसाठी गायन सादरीकरण आयोजित करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या उपक्रमांच्या माध्यमातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *