• Thu. May 14th, 2026

पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे व किर्तनकार दिपालीताई गणगे यांना पुरस्कार जाहीर

ByMirror

May 13, 2026

निमगाव वाघा येथील सहाव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे रविवार, दि. 17 मे रोजी सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन आणि लोकपरंपरांचा जागर करणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कवी, समाजप्रबोधक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.


या संमेलनात पोलीस दलात उल्लेखनीय कार्य करणारे नगर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांना ‘उत्कृष्ट पोलीस अधिकारी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. तसेच वारकरी परंपरेचा वारसा जपत किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या युवा किर्तनकार ह.भ.प. सौ. दिपालीताई गणगे (कोकाटे) यांना ‘संत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे आणि समाजात वैचारिक जागृती निर्माण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
संमेलनात विविध साहित्यिक परिसंवाद, विचारमंथन सत्रे आणि काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील अनेक कवी व कवयित्री आपल्या कविता सादर करणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडे, अभंग आणि प्रेरणादायी कविता सादर करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाणार आहे. ग्रामीण संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि समाजजागृतीचा संगम या संमेलनातून अनुभवायला मिळणार आहे.


पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी पोलीस सेवेत अत्यंत कर्तव्यदक्षपणे काम करत अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या तत्पर कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आदर आणि विश्‍वास वाढला असल्याचे मानले जाते. विविध गुन्हे उघडकीस आणून अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘उत्कृष्ट पोलीस अधिकारी पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.


दरम्यान, चिचोंडी पाटील येथील युवा किर्तनकार ह.भ.प. सौ. दिपालीताई गणगे (कोकाटे) या आपल्या प्रभावी किर्तन शैलीतून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. अध्यात्म, संस्कार आणि नैतिक मूल्यांचा संदेश देत त्या युवक-युवतींना योग्य दिशा देण्याचे काम करीत आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा आधुनिक काळात प्रभावीपणे जपण्याचे कार्य त्यांनी केले असून धार्मिक व सामाजिक विषयांवर जनजागृती घडवून आणली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना ‘संत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *