महिला सक्षमीकरण, साहित्य आणि सामाजिक कार्याचा गौरव; जिल्हा मराठाच्या 10 वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी चादर व ब्लँकेट वाटप
मुळे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन युवकांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे -प्रा. शशीकांत गाडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वर्गीय माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीचा “शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवनगौरव पुरस्कार” ज्येष्ठ साहित्यिका तथा महिला बँकेच्या संस्थापिका प्रा. मेधाताई यशवंतराव काळे यांना प्रदान करण्यात आला.
कायनेटिक चौक येथील यश ग्रॅण्ड हॉटेल येथे आयोजित या सोहळ्याला प्रा. शशीकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक भापकर, अध्यक्ष मुकेश माधवराव मुळे, उपाध्यक्ष दत्ता पाटील नारळे, सचिव प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, खजिनदार बजरंग पाडळकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, डॉ. लक्ष्मण कदम, प्राचार्य हनुमंतराव कणसे, प्रा लालचंद हराळ, सुनील म्हस्के, डॉ महेश मुळे यांच्यासह प्रतिष्ठानचे अनेक सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय माधवराव मुळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
प्रास्ताविकात मुकेश माधवराव मुळे यांनी या पुरस्कारामागील उद्देश स्पष्ट करत, पहिल्यांदाच एका महिलेला हा सन्मान दिला जात असल्याचे नमूद केले. पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ रामदास टेकाळे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रा. मेधाताई काळे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व गौरवचिन्ह महावस्त्र , श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना प्रा. मेधाताई यशवंतराव काळे म्हणाल्या की, माधवराव मुळे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही अत्यंत भावनिक व अभिमानाची बाब आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अतुलनीय कार्य केले असून, त्यांची तुलना होऊ शकत नाही. मुकेश माधवराव मुळे यांनी त्यांच्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे.
यावेळी त्यांनी आपल्या बालपणातील आठवणी, साहित्यिक प्रवास, विविध संस्थांतील कार्य, प्रवासवर्णन तसेच अंबिका महिला बँकेच्या स्थापनेमागील प्रेरणा याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि साहित्यिक जीवनाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. डॉ. विवेक भापकर यांनी प्रा. काळे यांच्या प्रवासवर्णनाचे कौतुक करताना, आबासाहेब मुळे यांच्या सहवासातील अनुभव सांगितले.
प्रा. शशीकांत गाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. आबासाहेब मुळे यांनी स्वतःला उद्योग-व्यवसायाकडे वळण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांमुळे आजही अनेकांना दिशा मिळते. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी शहरात व्यवसायात दबदबा निर्माण केला. “शेतकऱ्याचा मुलगा देखील मोठा उद्योगपती होऊ शकतो” हे त्यांनी सिद्ध केले. युवकांनी उद्योग-व्यवसायाकडे वळणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. विविध उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. लेखापरीक्षण अहवाल, ताळेबंद व अंदाजपत्रक मांडण्यात आले. नवीन उपक्रमांसाठी सदस्यांनी सूचना मांडल्या. आप्पासाहेब शिंदे यांनी आधुनिक शेतीवरील व्याख्यान सुचवले. संजय जाजगे यांनी विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त वह्या वाटप उपक्रम सुचवला. बी.के. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले
वार्षिक सभेच्या अध्यक्षीय भाषणात मुकेश माधवराव मुळे यांनी सांगितले की, माधवराव मुळे यांच्यावर प्रेम असलेली कोणतीही व्यक्ती प्रतिष्ठानची सदस्य होऊ शकते. इयत्ता 11 वी पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी विशेष मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले, तर आभार दत्ता पाटील नारळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश मुळे, सागर देवकर, जासूद निलेश, दिनकर मुळे, श्री स़तोष आदींनी परिश्रम घेतले.
–—
10 वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठानच्या वतीने चादर व ब्लँकेट वाटप
स्वर्गीय माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जिल्ह्यातील 10 वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना चादर व ब्लँकेटचे वाटप सोहळा पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
