ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात माणुसकीचा संदेश देत गेल्या दोन दशकांपासून निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणारे मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांना यंदाचा ‘संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित सहाव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. 16 मे रोजी हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात पार पडणार आहे. या संदर्भातील माहिती संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
अल्ताफ सय्यद हे मागील 20 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून, समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने काम करत आहेत. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची मोठी दखल घेतली गेली होती. शरद पवार विचार मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.
कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेपासून त्यांनी फ्रंटलाइन वर्कर्ससाठीही मोठे योगदान दिले. बुथ हॉस्पिटलला आवश्यक साहित्य पुरविणे, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एनर्जी ड्रिंक, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य देऊन त्यांना सहकार्य करण्यात आले. संकटकाळात अनेक गरजू नागरिकांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता.
समाजात वाढत चाललेल्या जातीय आणि धार्मिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर ‘मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठान’ची स्थापना करून सय्यद यांनी समाजात ऐक्य, बंधुता आणि माणुसकीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य सुरू केले. धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन सर्वसामान्यांना आधार देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक मदत, साहित्य वाटप, मार्गदर्शन तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत आहेत. गरीब व होतकरू कुटुंबांना विविध प्रकारे मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांना ‘संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. अल्ताफ सय्यद यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल विविध सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
