• Thu. Aug 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

संविधान मूल्यांचा जागर; बोल्हेगावात न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश

ByMirror

Jun 4, 2026
‘संविधानाने जगण्याचा संदेश स्वीकारा’ -कुमारसिंह वाकळे

ज्ञानदीप फाऊंडेशन व सीयोन चर्चच्या संयुक्त विद्यमाने संविधान प्रबोधन कार्यक्रम उत्साहात


‘संविधानाने जगण्याचा संदेश स्वीकारा’ -कुमारसिंह वाकळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ज्ञानदीप फाऊंडेशन आणि सीयोन चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने बोल्हेगाव येथील मोरया पार्क फेज-2 परिसरात संविधान जागर व प्रबोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी परिसरात अशोक चक्र असलेला निळा ध्वजाला अभिवादन करण्यात आले. संविधान, सामाजिक समता आणि सर्वधर्मसमभाव या संकल्पनांवर आधारित या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक कुमारसिंह वाकळे, कॉ. अनंत लोखंडे, पास्टर प्रशांत चक्रनारायण, फादर अनिल कसबे, सुमेध गायकवाड, ज्ञानदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष कॉ. पंकज लोखंडे, सुनिल भालेराव, राजेंद्र लोखंडे, माया जाधव, सारिका गागर्डे, ज्योती साठे, जयश्री गायकवाड, लतिका कसबे, प्रियांका साळवे, शारदा गायकवाड, निलेश चक्रनारायण, पास्टर गणेश लावरे, अभिमन्यू साळवे, जावेद सय्यद, दिलशाद अन्सारी, सनी साळवे, आकाश दळवी, प्रा. प्राजक्ता लोखंडे, क्लेरा लोखंडे, नितीन साठे, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना फादर अनिल कसबे यांनी देशातील अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण सर्व घटकांना समानपणे मिळाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सामाजिक ऐक्य आणि संविधानिक मूल्यांच्या बळावरच सर्व समाजघटकांना न्याय मिळू शकतो, असे त्यांनी सांगून ख्रिस्ती समाजाला संरक्षणाची गरज त्यांनी व्यक्त केली.


पाहुण्यांचे स्वागत ज्ञानदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष कॉ. पंकज लोखंडे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गीतांवर आकर्षक लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सांस्कृतिक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.


नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी भारतीय संविधानाचा मूलभूत संदेश समजून घेण्याचे आवाहन केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, समता आणि संविधानिक मूल्यांच्या आधारे समाज परिवर्तनाचा मार्ग दाखविला. मात्र आज शिक्षण घेतलेली माणसेही व्यक्तीच्या गुणवत्तेपेक्षा त्याची जात शोधण्याचा प्रयत्न करतात, ही दुर्दैवी बाब आहे. देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी जातीवादाला थारा देता कामा नये. माणुसकी आणि संविधान या दोन मूल्यांच्या आधारे समाज सक्षम होऊ शकतो,” असे ते म्हणाले.


अशोक गायकवाड यांनी जातीवाद आणि धर्माधारित राजकारणावर कठोर टीका केली. “प्रत्येक व्यक्तीची जात शोधण्याची प्रवृत्ती ही समाजाला मागे नेणारी आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणे देशासाठी घातक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश एकसंघ ठेवण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. मात्र आज जातीय ध्रुवीकरण वाढवून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


पुढे बोलताना त्यांनी जातीनिहाय जनगणनेची गरज व्यक्त केली. “देशातील विविध घटकांचे प्रमाण आणि त्यांच्या हक्कांचे योग्य वाटप निश्‍चित करण्यासाठी अद्ययावत जातीनिहाय जनगणना होणे आवश्‍यक आहे. जुन्या आकडेवारीच्या आधारे धोरणे ठरविणे योग्य ठरणार नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.


कॉ. अनंत लोखंडे यांनी सर्व धर्मांच्या केंद्रस्थानी माणुसकी असल्याचे सांगितले. “धर्म कोणताही असो, तो प्रेम, करुणा आणि बंधुभाव शिकवतो. मात्र आज धर्माचा वापर अनेकदा राजकारणासाठी केला जात आहे. शेवटी माणसाच्या आयुष्यात टिकून राहते ती त्याची माणुसकी. त्यामुळे परस्परांमध्ये प्रेम, सन्मान आणि बंधुभाव वाढविण्याची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पास्टर प्रशांत चक्रनारायण यांनी कोरोना काळातील सामाजिक ऐक्य आणि परस्पर सहकार्याची भावना आज पुन्हा दृढ करण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजातील सर्व घटकांना समान न्याय आणि संरक्षण मिळाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानातील मूल्यांचा प्रसार, सामाजिक समता, सर्वधर्मसमभाव आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी संविधानिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *