• Wed. Jun 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीत सेवाभावी कार्याचा गौरव; मतीमंद मुलांवर ‘लहान पावले उज्ज्वल भविष्य’ पुस्तकाचे प्रकाशन

ByMirror

Jun 3, 2026
संस्थेची प्रगती समर्पित कर्मचाऱ्यांमुळे होते -डॉ. रवींद्र साताळकर

विजय बळीद यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार; शिक्षण व पुनर्वसन क्षेत्रासाठी मार्गदर्शक पुस्तकाचे अनावरण


संस्थेची प्रगती समर्पित कर्मचाऱ्यांमुळे होते -डॉ. रवींद्र साताळकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेतील कनिष्ठ लिपिक विजय मानाजी बळीद यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात मतिमंद मुलांच्या शाळेतील वाचा उपचार तज्ज्ञ विक्रम उंडे लिखित ‘लहान पावले उज्ज्वल भविष्य’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.


मतिमंद विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांच्या हस्ते विजय बळीद व सौ. वर्षा बळीद यांचा सपत्नीक मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रामाणिक, निष्ठावंत व सेवाभावी कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. संस्थेच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.


तसेच डॉ. साताळकर यांच्या हस्ते विक्रम उंडे लिखित ‘लहान पावले उज्ज्वल भविष्य’ या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. मतिमंद मुलांच्या शिक्षण, सर्वांगीण विकास आणि पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पालक, शिक्षक, विशेष शिक्षक, वाचा उपचार तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वास उपस्थितांनी व्यक्त केला. बौद्धिक अक्षम मुलांच्या संगोपनातील आव्हाने, त्यावरील उपाययोजना आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आल्याने ते समाजासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


कार्यक्रमास मतिमंद विकास शिक्षण मंडळाचे सचिव पी. डी. कुलकर्णी, ज्येष्ठ सदस्य अविनाश कुलकर्णी, सदस्य मकरंद खंडागळे तसेच कार्यशाळेचे इन्चार्ज भाऊसाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मतिमंद मुलांची शाळा, पाथर्डी यांच्या अध्यक्षा अनिता निराळी, मुख्याध्यापक विजय आरोटे, दिलीप जगधने, अतुल भंडारे, चांगदेव खेमनर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विजय बळीद यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. तसेच ‘लहान पावले उज्ज्वल भविष्य’ या पुस्तकाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. यामध्ये पी. डी. कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, मकरंद खंडागळे, सुधीर रणदिवे, रूपाली भिसे आदींनी आपले विचार व्यक्त केले.


डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले की, विजय बळीद यांनी आपल्या सेवाकाळात जबाबदारीने काम केले. कोणत्याही संस्थेची प्रगती केवळ इमारतींमुळे होत नाही, तर त्या संस्थेत कार्य करणाऱ्या समर्पित कर्मचाऱ्यांमुळे होत असते. बळीद यांचे योगदान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तर विक्रम उंडे यांनी लिहिलेले ‘लहान पावले उज्ज्वल भविष्य’ हे पुस्तक केवळ पुस्तक नसून विशेष मुलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या पालक, शिक्षक आणि समाजासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. विशेष मुलांना समजून घेण्यासाठी संवेदनशीलता, संयम आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. हे पुस्तक त्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


लेखक विक्रम उंडे यांचे बौद्धिक अक्षम मोठे बंधू सुधीर उंडे, वडील राजाराम उंडे, आई हिराबाई उंडे तसेच उंडे कुटुंबातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालक, हितचिंतक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून दोन्ही उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे इन्चार्ज भाऊसाहेब कदम यांनी केले. त्यांनी विजय बळीद यांच्या सेवाकार्याचा आढावा घेत ‘लहान पावले उज्ज्वल भविष्य’ या पुस्तकाची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी कुटे यांनी केले तर विक्रम उंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *