• Wed. Jun 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

शोषित-वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्व. शिवाजी कर्डिले यांचा आयुष्यभर संघर्ष’ -गणेश बनकर

ByMirror

Jun 2, 2026
भाजप ओबीसी मोर्चाकडून स्व. शिवाजी कर्डिले यांना अभिवादन

भाजप ओबीसी मोर्चाकडून स्व. शिवाजी कर्डिले यांना अभिवादन


जिल्हाभर आरोग्य शिबिर व वृक्षारोपण अभियान राबविण्याचा निर्धार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शेतकरी कुटुंबातून आणि अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत माजी मंत्री स्व. आ. शिवाजी कर्डिले यांनी समाजकारण व राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सत्तेचा वापर केवळ राजकीय लाभासाठी न करता समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना राजकारणातील सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपल्याची भावना मनात दाटून येते, असे मत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी व्यक्त केले.


भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने माजी मंत्री स्व. आ. शिवाजी कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्व. कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी यश पानमळकर, रोहित भुजबळ, महेश कर्डिले, रविराज निमसे तसेच ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


पुढे गणेश बनकर म्हणाले की, स्व. शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्यावर त्यांचा भर होता. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी ते सातत्याने संघर्ष करत राहिले. त्यामुळेच ते केवळ राजकीय नेते न राहता जनतेच्या मनातील लोकनेते बनले.


शेतकऱ्यांशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून स्व. कर्डिले यांची ओळख होती. ग्रामीण भागातील विकासकामे, सिंचन, पाणी, रस्ते आणि शेतीसंदर्भातील प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विकासाची फळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावीत, यासाठी त्यांनी अनेक योजना आणि उपक्रम प्रभावीपणे राबविले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आणि आत्मीयता निर्माण झाली होती. स्व. कर्डिले यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा जतन करण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चा विविध उपक्रम राबविणार असल्याचेही बनकर यांनी यावेळी सांगितले.


आमदार अक्षय कर्डिले भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अभियान हाती घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उपस्थितांनी स्व. शिवाजी कर्डिले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *