गुंजन गोळे 99.80 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम; 59 विद्यार्थ्यांनी मिळवले 90 टक्क्याहून अधिक गुण
गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव; गुणवत्तेची परंपरा कायम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) दहावी बोर्डाच्या परीक्षेत यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या दहावी बोर्ड परीक्षेत शाळेचा 100 टक्के निकाल लागला असून, तब्बल 59 विद्यार्थ्यांनी 90 टयांहून अधिक गुण मिळवत शाळेच्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त ॲड. गौरव मिरीकर, मुख्याध्यापक कैलास साबळे, उपमुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, पर्यवेक्षक रेणुका परदेशी, नंदू जाधव, निलीमा शिंदे, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या निकालात गुंजन महेश गोळे हिने 99.80 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शाळेच्या गुणवत्ता यादीत ओम संतोष मिसाळ (98%) याने द्वितीय, नक्षत्रा भुमेश इप्पलपेल्ली (97.80%) हिने तृतीय, वेदिका विजय गावडे (97.60%) हिने चौथा, शताक्षी प्रशांत नगरकर (97.20%) हिने पाचवा क्रमांक मिळवला. तसेच तनिष्का बाळासाहेब गवळी आणि प्रणाली संदीप रसाळ (96.80%) यांनी संयुक्तपणे सहावा क्रमांक पटकावला. कांक्षिणी राहुल पांढरे (96.60%) हिने सातवा, तर भक्ती योगेश दळवी, सौंदर्या शंकर बिमन आणि रोहित पुष्कर तांबोळी (96.20%) यांनी संयुक्तपणे आठवा क्रमांक मिळवला.
यंदाच्या निकालातील आणखी एक विशेष बाब म्हणजे संस्कृत विषयात दोन विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवून विशेष प्रावीण्य सिद्ध केले. तसेच गणित विषयातही एका विद्यार्थ्याने शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द व परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
