• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील अनुराधा मिश्रा यांचा भूतानमध्ये डंका!

ByMirror

Nov 25, 2025
थिंपू येथे 350 किलो वजन उचलून विक्रमी कामगिरी

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाल


थिंपू येथे 350 किलो वजन उचलून विक्रमी कामगिरी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. महिलांच्या विभागात त्यांनी 350 किलो वजन उचलून विक्रमी कामगिरी करत दोन सुवर्ण पदके पटकावली. संयुक्त भारतीय खेळ फाऊंडेशनच्या (इंडू श्री ऑर्गनायझेशन) वतीने या खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


भूतानची राजधानी थिंपू येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशिया खंडातील विविध देशांमधील नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात अनुराधा मिश्रा यांनी दाखवलेले दमदार प्रदर्शन भारतीय संघासाठी अभिमानास्पद ठरले.


मिश्रा यांनी महिलांच्या सिनियर तसेच मास्टर गटात प्रत्येकी सुवर्णपदक पटकावत बाजी मारली. अत्यंत काट्याच्या स्पर्धेत 350 किलोपर्यंत वजन उचलत त्यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक सामर्थ्याची चमकदार प्रात्यक्षिके दिली. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे त्यांची जागतिक चॅम्पियनशिपसाठी निवड देखील झाली आहे.


या चमकदार कामगिरीमागे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे आणि राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अनुराधा मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकरमध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या देखरेखीखाली सराव करतात. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचा झेंडा उंचावला आहे. मिश्रा यांना स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताबही मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनुराधा मिश्रा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *