• Mon. Aug 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

आनंदऋषीजी हॉस्पिटल गरजूंच्या आरोग्याचा आधार -सविता फिरोदिया

ByMirror

Aug 9, 2026
आनंदऋषीजी हॉस्पिटल गरजूंच्या आरोग्याचा आधार -सविता फिरोदिया

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 150 रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी; आचार्य श्री आनंदऋषिजी यांच्या 126 व्या जयंतीचा उपक्रम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटल हे मानवतेचे मंदिर असून, गरजूंच्या आरोग्याचा आधार ठरले आहे. हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. या सेवा कार्यात योगदान देताना समाधान आणि आनंद मिळतो. समाजाची गरज ओळखून हॉस्पिटलमध्ये नवनवीन सुविधा निर्माण केल्या जात आहेत. या सुविधा समाजाला अर्पण करून त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असल्याचे प्रतिपादन सौ. सविता रमेश फिरोदिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त सीए रमेश फिरोदिया व सौ. सविताताई फिरोदिया (फिरोदिया एज्युकेशन ट्रस्ट) यांच्या वतीने स्व. बदामबाई फिरोदिया यांच्या स्मरणार्थ हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सीए रमेश फिरोदिया, साक्षी फिरोदिया, सीए आयपी अजय मुथा, निखीलेंद्र लोढा, माणकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. विनय छल्लाणी, डॉ. स्वप्निल शिंदे आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात निखीलेंद्र लोढा यांनी फिरोदिया परिवाराच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, ‘शिका, कमवा आणि समाजाला परत द्या,’ या तत्त्वावर फिरोदिया परिवाराचे जिल्ह्यात सामाजिक योगदान सुरू आहे. गेल्या 15 वर्षांत त्यांनी सामाजिक चळवळीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अल्पदरात सिटीस्कॅन, एमआरआय मशीन तसेच ब्लड बँकेची सुविधा त्यांच्या आर्थिक योगदानामुळे शक्य झाली आहे. हॉस्पिटलच्या सेवा कार्यात त्यांचे मोठे योगदान असून, अनेक प्रकल्पांना त्यांनी हातभार लावला आहे. हॉस्पिटलच्या अद्ययावत मशिनरीसाठीही त्यांनी योगदान दिले आहे. तसेच अनेक संस्थांचे आधारस्तंभ म्हणून ते कार्य करत असल्याचे लोढा यांनी सांगितले.


सीए आयपी अजय मुथा म्हणाले की, आयुष्यात प्रगती करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून सीए रमेश फिरोदिया यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे. बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन ते सीए झाले. मुंबईत उत्तम यश मिळवल्यानंतरही सामाजिक बांधिलकी जोपासत ते पुन्हा आपल्या शहराशी व गावाशी जोडले गेले आणि सामाजिक योगदान देण्यास सुरुवात केली. आपल्या मूळ गावात त्यांनी महाविद्यालयाची स्थापना केली असून, त्यामध्ये 800 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजाच्या प्रत्येक कार्यात योगदान देताना जैन सोशल फेडरेशनच्या सेवाकार्यातही त्यांचे सहकार्य लाभत आहे. शिक्षण, आरोग्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले असून, मानवसेवेच्या कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो, असे मुथा यांनी सांगितले.


डॉ. राहुल अग्रवाल म्हणाले की, कार्डियाक विभाग हा आनंदऋषीजी हॉस्पिटलचे हृदय आहे. उत्तम दर्जाची आरोग्यसेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे हॉस्पिटलने भारतात नावलौकिक मिळवला आहे. आतापर्यंत 15 हजारांपेक्षा अधिक बायपास सर्जरी यशस्वी झाल्या असून, एक लाखांपेक्षा अधिक अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. अनिकेत कटारिया म्हणाले की, हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाची संपूर्ण टीम 24 तास कटिबद्ध राहून रुग्णांना सेवा देत आहे. उत्तम दर्जाची आरोग्यसेवा आणि तत्पर सेवेतून हॉस्पिटलने रुग्णांमध्ये मोठा विश्‍वास निर्माण केला आहे. पूर्वी महाराष्ट्रात हृदय शस्त्रक्रियेसाठीची केंद्रे कमी होती आणि त्यासाठीचा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे समाजाची गरज लक्षात घेऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कार्डियाक सेंटर उभारण्यात आले. या माध्यमातून गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी आरोग्यसेवेची दारे खुली करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.


या हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात 150 रुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. शिबिरात केवळ 3 हजार रुपयांमध्ये अँजिओग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तपासणीनंतर गरजेनुसार विविध हृदय शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर आभार माणकचंद कटारिया यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *