नगर तालुक्यातील गणेश मंडळ व ईद उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
नगर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने पार पडली बैठक
अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी नगर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने नगर-कल्याण महामार्ग येथील अमरज्योत लॉनमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे आवाहन करुन गणेश मंडळ व ईद उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या.
नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याप्रसंगी पोलीस मित्र, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत भोसले यांनी गणेश मुर्तीची स्थापनेपूर्वी घ्यावयाची कायदेशीर परवानगी, मंडप जागा, विज कनेक्शन, स्वयंसेवक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरा लावणे व बॅनरबाबत ग्रामंपचायतचा नाहरकत दाखला घेणे तसेच गणेश विसर्जनाचे सूचना करुन गणेश मुर्तीची विटंबना होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे स्पष्ट केले.
सार्वजनिक मंडळाचा देखावा तयार करताना जातीय व धार्मिक भावना दुखावल्या जाणार नसल्याचे सांगून, अनंत चतुर्दशी व ईद ए मिलाद एकाच दिवशी येत असल्याने एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करुन दोन्ही सण उत्सवात साजरा करण्याचे भोसले यांनी आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी अनंत चतुर्दशी व ईद ए मिलाद शांततेत साजरे करुन एक आदर्श निर्माण केला जाणार आहे. डिजेला फाटा देऊन पारंपारिक वाद्यासह गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना मांडली.
तर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवात सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना एकत्र करण्यासाठी सार्वजनिक उत्सव साजरे केले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन हा उत्सव साजरा करण्याचे त्यांनी सांगितले. नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची बैठक पार पडली.