• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

प्रयास व दादी-नानी ग्रुपकडून महिलांच्या सक्षमीकरणाचा जागर

ByMirror

Apr 17, 2026
प्रयास व दादी-नानी ग्रुपकडून महिलांच्या सक्षमीकरणाचा जागर

रेणुका माता रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला विविध उपक्रमांनी नटलेला कार्यक्रम


प्रयास ग्रुपने महिला सक्षमीकरणाची चळवळ चालवली -मंगलाताई भालेराव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रयास ग्रुप व दादी-नानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या कार्य-कर्तृत्वाचा जागर करणारा कार्यक्रम रेणुका माता रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी रेणुका माता मल्टीस्टेटच्या संचालिका मंगलाताई भालेराव, जयंती भालेराव, नगरसेवक ऋग्वेद गंधे, मीनलताई गंधे, सुमित वर्मा, जयश्री पोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमासाठी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयासच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, शोभा मुळे, जयश्री पुरोहित, उपाध्यक्ष सुचेता बोरकर, खजिनदार मेघना मुनोत, राखी अहिर, छाया भंडारी, प्रतिभा रासकर, सुजाता कदम, आरती थोरात, लीला अग्रवाल, सुरेखा जंगम, अरुणा गोयल, अलका वाघ, सुनीता काळे, नीलिमा पवार, उषा सोनटक्के, प्रतिभा पेंडसे, आरती वाडेकर, आशा गायकवाड, रेखा फिरोदिया आदींसह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात जयश्री पोटे यांनी महिलांना स्कार्फ कसा बांधावा आणि ओढणी कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे नुकतेच निधन झाल्याबद्दल ग्रुपतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


प्रास्ताविकात जयाताई गायकवाड यांनी ग्रुपच्या कार्याचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, “मागील अनेक वर्षांपासून प्रयास ग्रुप महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. आज अनेक महिला या ग्रुपशी जोडल्या गेल्या असून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत अलकाताई मुंदडा यांनी केले.


नगरसेवक ऋग्वेद गंधे म्हणाले की, आजच्या काळात महिलांचा सहभाग प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता समाजकार्यातही पुढाकार घ्यावा. प्रयास व दादी-नानी ग्रुपसारख्या संस्था महिलांना एक व्यासपीठ देतात, जिथे त्या आपले कौशल्य विकसित करू शकतात. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सुमित वर्मा यांनी आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा असते. तिच्या ममतेची तुलना कोणाशीच होऊ शकत नसल्याचे स्पष्ट करुन आईच्या ममतेवर आधारित भावस्पर्शी गाणे सादर केले, ज्याला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.


मंगलाताई भालेराव म्हणाल्या की, महिलांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लहानसहान गोष्टींमधूनही आत्मविश्‍वास वाढतो. प्रयास ग्रुपने महिला सक्षमीकरणाची चळवळ चालवली असून, या कार्यात रेणुका माता मल्टीस्टेटचा नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच सोडतीद्वारे काही भाग्यवान महिलांनाही बक्षिसे प्रदान करण्यात आली. महिलांसाठी भोजनाची व्यवस्था प्रशांत जयंती भालेराव यांच्यातर्फे करण्यात आली होती.


स्पर्धेतील बक्षिसांचे प्रायोजकत्व नगरसेवक ऋग्वेद गंधे यांनी केले. नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीने अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात आला. तसेच सुमित वर्मा यांच्या वतीने सर्व महिलांना स्कार्फचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर आभार सुचेता बोरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपा सोनी व उज्वला मालू यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *