• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

फिजिक्सवालाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची सावेडीत जल्लोषमय मिरवणूक

ByMirror

Feb 26, 2026
फिजिक्सवालाच्या गुणवंत विद्यार्थ्यांची सावेडीत जल्लोषमय मिरवणूक

जेईई मेन्स 2026 मध्ये मनीष मुटकुळे जिल्ह्यात प्रथम

तीन विद्यार्थ्यांना 95 पेक्षा अधिक पर्सेंटाइल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिजिक्सवालाच्या अहिल्यानगर केंद्रातील विद्यार्थ्यांनी जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) मेन्स 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची छाप उमटवली आहे. पहिल्याच वर्षाच्या 95 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवलेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांसह सावेडी उपनगरात भव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला.


मनीष सुनील मुटकुळे याने 99.56 पर्सेंटाइल मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेच्या गुणवत्ता यादीतही त्याने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे मनीषने भौतिकशास्त्र विषयात 99.18 तर गणित विषयात 99.78 पर्सेंटाइल मिळवत विषयवारही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. नियमित सराव, वेळेचे अचूक नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे यशाचे प्रमुख घटक असल्याचे त्याने सांगितले.


याचबरोबर जगताप आदित्य संदीप (95.87 पर्सेंटाइल) आणि सोनवणे समर्थ वासुदेव (95.46 पर्सेंटाइल) यांनीही पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळवत केंद्राचा लौकिक वाढवला. या तिघांच्या कामगिरीमुळे स्पर्धा परीक्षांसाठी संस्थेने राबवलेल्या शिस्तबद्ध नियोजनाची प्रचिती आली आहे.
या निकालाचा सावेडी परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रोफेसर कॉलनी चौक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी अभिवादन केले व एकच जयघोष केला. त्यानंतर प्रोफेसर चौकातून भिस्तबाग चौक, एकविरा चौक मार्गे गुलमोहर रोड येथील केंद्रापर्यंत रॅली काढण्यात आली. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि युवक-युवतींचा उत्साही सहभाग यामुळे परिसर दणाणून गेला. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह पालक, मार्गदर्शक शिक्षक आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


केंद्राचे संचालक हरीश तावरे म्हणाले, पहिल्याच निकालात तीन विद्यार्थ्यांनी 95 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवणे ही आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीची पावती आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देत परिणामकेंद्रित तयारीवर आम्ही भर देतो. सातत्यपूर्ण चाचण्या, शंका निरसन सत्रे आणि अभ्यासाचे वैज्ञानिक नियोजन यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढतो. या सर्व नियोजनपूर्व अभ्यासाने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *