प्रलंबित मागण्यांवर शासनाचे दुर्लक्ष; अहिल्यानगरमधील महाविद्यालयांतील कर्मचारीही आंदोलनात उतरणार
बेमुदत संपाचा इशारा; शासनाच्या आश्वासनांना कंटाळले शिक्षकेतर कर्मचारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. विविध मागण्यांवर शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्ष शासन निर्णय निर्गमित होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासनाच्या या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीने आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. त्यानंतरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती सचिव संतोष कानडे यांनी दिली.
विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचारी शैक्षणिक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश, परीक्षा, निकाल, प्रशासकीय कामकाज, ग्रंथालये आणि प्रयोगशाळांचे कामकाज सुरळीत ठेवण्यात या कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र, या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार 10, 20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर अनुज्ञेय असलेली सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सन 2005 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू अथवा पूर्ण झालेल्या आणि त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या अनुदानित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या शिक्षकेतर पदांच्या भरतीस शिक्षक पदभरतीप्रमाणे तातडीने मंजुरी द्यावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून, प्रशासकीय कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.
अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, महाविद्यालयीन व विद्यापीठीय प्रयोगशाळा तसेच ग्रंथालय परिचरांना कालबद्ध पदोन्नतीमध्ये 4000-6000 ही वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांबाबत शासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता आता प्रत्यक्ष शासन निर्णय निर्गमित होणे आवश्यक असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनात अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले आहेत. आंदोलनानंतरही शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील टप्प्यात बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात जिल्हा सचिव संतोष कानडे, रविंद्र वर्पे, सिताराम मुळे, शरद खरात, जगन्नाथ सावळे, राजू पाटील, मनोज पवार, बाबु शिंदे, दिपक वराट, जगदीश कोंगे, विजय म्हस्के, दत्तात्रय भडकवाड, महादेव चेमटे, दादासाहेब भिडे, बाबासाहेब वाघुले, योगेश शेळके, सविता डांगे, जया साळवे, सचिन लांघी, भानुदास गुंजाळ, दत्तात्रय हिरणवाळे, जनार्दन बर्डे, गणेश गोरे, अजय ठोंबरे, अतुल हापसे, काशिनाथ मते, प्रशांत घोडके, कलीम पठाण, सुरेश शिंगणे न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील शिक्षकेतर कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

