• Thu. Nov 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ; फटाक्यांना नकार, पर्यावरण संवर्धनाचा स्वीकार!

ByMirror

Nov 4, 2026
विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प

विद्यार्थ्यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प


लहान वयापासूनच पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे -संदीप भोर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण! मात्र, या आनंदोत्सवात फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश केडगाव येथील सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी दिला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शाळेत ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे निर्माण होणारे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण तसेच त्याचे मानवी आरोग्य, पशुपक्षी आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. फटाक्यांच्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच पशुपक्ष्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे सण साजरा करताना इतरांच्या आरोग्याचा आणि निसर्गाचा विचार करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.


यावेळी विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता दिवे, पणत्या आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या माध्यमातून दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. तसेच वृक्षांचे संवर्धन करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणे, याबाबतही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.


याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले की, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रदूषणमुक्त दिवाळी हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित उपक्रम नसून पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः फटाके न फोडण्याचा संकल्प करण्याबरोबरच आपल्या कुटुंबीयांना आणि परिसरातील नागरिकांनाही पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रेरित करावे. निसर्गाचे रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *