• Wed. Nov 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिवाळीत सेवाप्रीतच्या महिलांनी उजळविले बालभवन; इन्व्हर्टरच्या भेटीतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अंधार केला दूर!

ByMirror

Nov 4, 2026
वीज गेल्यानंतरही विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबणार नाही; स्नेहालयच्या उत्कर्ष बालभवनला इन्व्हर्टरची भेट

फक्त दिवेच नाही, तर विद्यार्थ्यांचे भविष्यही केले प्रकाशमान! सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा उत्कर्ष बालभवनला इन्व्हर्टरचा आधार


वीज गेल्यानंतरही विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबणार नाही; स्नेहालयच्या उत्कर्ष बालभवनला इन्व्हर्टरची भेट


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि नव्या आशेचा सण! या सणाचा खरा अर्थ केवळ दिव्यांची रोषणाई करण्यात नसून, गरजूंच्या आयुष्यात आनंदाचा आणि आशेचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, याची प्रचिती सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या महिलांनी घडवून आणली. कोठला येथील स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनमध्ये दिवाळी साजरी करताना फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेची जाणीव ठेवून इन्व्हर्टर भेट देण्यात आला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये, त्यांना अंधारामुळे शिक्षण सोडून घरी परतावे लागू नये, या संवेदनशील भावनेतून देण्यात आलेल्या या भेटीमुळे बालभवनमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग अधिक प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिवाळीच्या निमित्ताने सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या सदस्यांनी बालभवनमधील विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे केले. यावेळी सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख डॉ. सिमरन वधवा, खजिनदार अर्चना खंडेलवाल यांच्यासह दीपिका चोहितरमानी, शेरी धुप्पड, कल्पना जामगावकर, डॉ. प्रिया मुनोत, वीणा जगताप, अनु थापर, गगन बग्गा, लीना दंडवाणी, जया मेघानी, निशी गुजराती, स्वीटी गुप्ता आणि टीना कुमार उपस्थित होत्या.


बालभवनच्या रुबीना शेख यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. बालभवनमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या गरजांची माहिती त्यांनी दिली. पूजा काळे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. यास्मिन शेख यांनी स्वागत केले.
यावेळी जागृती ओबेरॉय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात मोठे ध्येय ठेवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, जीवनात स्वतःला कधीही कमी समजू नका. आपण कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो, यापेक्षा त्या परिस्थितीतून स्वतःला कसे घडवतो, याला अधिक महत्त्व आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी तिच्याशी धैर्याने सामना करून आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर प्रत्येकाला यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.


डॉ. सिमरन वधवा यांनी गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना जीवनमूल्यांची शिकवण दिली. जीवनात चांगले घडण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. अपेक्षित यश मिळण्यास उशीर झाला, तरी निराश होऊ नका. कधी कधी चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे सातत्याने प्रयत्न करत राहा, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पणती सजवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्पना जामगावकर आणि गगन बग्गा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पणत्या सजविण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध रंग, आकर्षक कलाकुसर आणि कल्पकतेचा सुरेख संगम साधत सुंदर पणत्या तयार केल्या. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.


या संपूर्ण उपक्रमातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने उत्कर्ष बालभवनला दिलेला इन्व्हर्टरचा सहयोग. अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे संध्याकाळच्या वेळी अभ्यासासाठी बालभवनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारामुळे शिक्षण थांबवून घरी परतावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन फाऊंडेशनच्या महिलांनी केवळ सणानिमित्त भेटवस्तू देण्यापुरता विचार न करता बालभवनची प्रत्यक्ष गरज ओळखली आणि इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला.
एखाद्या संस्थेला भेटवस्तू देणे आणि त्या संस्थेच्या गरजा समजून घेऊन तिच्या कार्याला पूरक सुविधा उपलब्ध करून देणे, यामध्ये मोठा फरक आहे. सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने दिलेला हा इन्व्हर्टर विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर करण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. वीज गेली तरी शिक्षणाचा दिवा विझणार नाही, ही भावना या सहकार्यातून अधोरेखित झाली. दिवाळीच्या प्रकाशपर्वात बालभवनमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटेवरील अंधकार दूर करण्याचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण असल्याची भावना बालभवनच्या उषा खोलम यांनी व्यक्त केली.


कार्यक्रमाच्या शेवटी फाऊंडेशनच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे करत सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. मिनाज शेख यांनी आभार प्रदर्शन करून सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *