नाशिक येथे अभिनेत्री शिल्पा शाहीर यांच्या हस्ते गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त दिला जाणारा ‘चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मृतीदिन सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री शिल्पा शाहीर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कलावंत विचार मंच, नाशिक आणि कमल फिल्म प्रोडक्शन, कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. म.सा. नाट्यगृह, पंडित नेहरू गार्डन, शालिमार, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री जयश्री वाघ होत्या. यावेळी स्वागताध्यक्ष सुनील मोफ्लढे, अभिनेत्री श्रुती देशमुख, कवी संजय आहेर, आनंदा साळवे, शाहीर सुनील चिंचोळीकर आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे हे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष असून ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. नगर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्यिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, जलसंधारण जनजागृती, रक्तदान शिबिरे, मतदार जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि स्त्री जन्माचे स्वागत अशा विविध उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
ग्रामीण युवक व महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने आणि सहा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या या बहुआयामी सामाजिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

