• Tue. Nov 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

दुष्काळाच्या झळा आता कवितेतून व्यक्त! अहिल्यानगरच्या काव्य लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Nov 3, 2026
संदीप रासकर प्रथम, बाळासाहेब देशमुख द्वितीय, रुपचंद शिदोरे तृतीय;

संदीप रासकर प्रथम, बाळासाहेब देशमुख द्वितीय, रुपचंद शिदोरे तृतीय;


राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार विजेत्यांचा गौरव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दुष्काळाची कारणे, त्याचे भीषण परिणाम आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या काव्य लेखन स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुष्काळाच्या वेदना, पाणीटंचाईचे वास्तव आणि जलसंवर्धनाचे महत्त्व कवींनी आपल्या कवितांमधून प्रभावीपणे मांडले. या स्पर्धेत वाघुंडे (ता. पारनेर) येथील संदीप रासकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि पै. नाना डोंगरे व्यायामशाळा, निमगाव वाघा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित कवींच्या लेखनकौशल्याला आणि काव्यप्रतिभेला व्यासपीठ मिळावे, तसेच साहित्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्‍नांवर जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.


स्पर्धेसाठी ‘दुष्काळाची कारणे, घ्यावयाची खबरदारी’ हा विषय देण्यात आला होता. यामध्ये दुष्काळामागील कारणे, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना, पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि पाणी बचतीचे महत्त्व अशा विविध विषयांवर कवींनी आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या. जिल्ह्यातील अनेक कवींनी सहभाग नोंदवित दर्जेदार कविता सादर केल्या.


या स्पर्धेत संदीप रासकर (वाघुंडे, ता. पारनेर) यांनी प्रथम क्रमांक, त्र्यंबकराव ऊर्फ बाळासाहेब देशमुख (केडगाव) यांनी द्वितीय क्रमांक, तर रुपचंद शिदोरे (पाथर्डी) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी अहिल्यानगर येथील धोंडीराम खांडेकर यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना राज्यस्तरीय नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 2026 मध्ये अनुक्रमे एक हजार, पाचशे आणि तीनशे रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *