• Thu. Oct 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागृती

ByMirror

Oct 22, 2026
संतुलित आहार, योग्य दिनचर्या आणि आरोग्याची काळजी हाच निरोगी जीवनाचा पाया -डॉ. श्रद्धा असोपा

निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचा मंत्र; डॉ. एन. जे. पाऊलबुधे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात व्याख्यान


संतुलित आहार, योग्य दिनचर्या आणि आरोग्याची काळजी हाच निरोगी जीवनाचा पाया -डॉ. श्रद्धा असोपा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावे, या उद्देशाने सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. एन. जे. पाऊलबुधे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘जागर आरोग्याचा – मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या उपक्रमांतर्गत युवकांचे आरोग्य या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. एन. जे. पाऊलबुधे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. श्रद्धा असोपा यांनी विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थिनींना आरोग्याचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयींचा अंगीकार करण्याचा संदेश देण्यात आला. बदलती जीवनशैली, आहाराच्या सवयी आणि आरोग्याबाबतची जागरूकता या बाबी युवकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या व्याख्यानामागील प्रमुख उद्देश होता.


डॉ. श्रद्धा असोपा यांनी आपल्या व्याख्यानातून आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व विशद केले. संतुलित आहार, नियमित दिनचर्या आणि निरोगी जीवनशैली यांचा आरोग्यावर होणारा परिणाम त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितला. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करताना दैनंदिन जीवनात आरोग्यपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. केवळ आजार झाल्यानंतर उपचार घेण्याऐवजी आरोग्य जपण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला.


आयुर्वेदविषयक ज्ञानाचा प्रसार करणे आणि समाजामध्ये आयुर्वेदाबाबत योग्य दृष्टिकोन निर्माण करणे, या उद्देशाने डॉ. असोपा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना आरोग्यविषयक माहिती मिळण्यासोबतच स्वतःच्या आरोग्याप्रती सजग राहण्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विनयनाथ पाऊलबुधे, संचालक साई पाऊलबुधे, उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, सहसचिव रामकिसन देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे आणि तज्ज्ञ संचालक डॉ. रेखी खुराना यांचे मार्गदर्शन लाभले. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा डावरे, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप कांबळे, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य सविता सानप तसेच विनायक मच्चा यांची यावेळी आवर्जून उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्राची मचे, प्राध्यापकवृंद आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. वसुधा देशपांडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. अमृता रत्नपारखी यांनी करून दिला, तर प्रा. उज्ज्वला आंबेडकर यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *