• Tue. Sep 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात श्रीमद्‌ भागवत कथा व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता

ByMirror

Sep 8, 2026
श्रीकृष्ण जन्मोत्सवाने रंगला भक्तीचा सोहळा; पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

कृष्णनामाच्या गजराने’ दुमदुमले निमगाव वाघा; काल्याच्या कीर्तनाने भागवत कथा सप्ताहाचा समारोप


श्रीकृष्ण जन्मोत्सवाने रंगला भक्तीचा सोहळा; पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानोबाराय जन्मोत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्‌ भागवत कथा व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची भक्तिमय वातावरणात उत्साहात सांगता झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगलेल्या या सप्ताहादरम्यान विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते. ह.भ.प. धनंजय महाराज उदावंत यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी त्यांनी कीर्तनातून भाविकांना मार्गदर्शन केले.
या धार्मिक सोहळ्यात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सप्ताहादरम्यान गावातून दिंडी प्रदक्षिणाही काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. सप्ताहात ह.भ.प. सौ. रत्नप्रभा दीदी काळे यांनी विविध धार्मिक व आध्यात्मिक विषयांवर श्रीमद्‌ भागवत कथेचे निरूपण केले. त्यांच्या रसाळ व ओघवत्या वाणीतील कथाकथनातून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, भक्तीचे महत्त्व, धर्म, नीती आणि संस्कार यांचे भावपूर्ण विवेचन करण्यात आले. त्यांच्या निरूपणाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


शनिवार, दि. 29 ऑगस्ट रोजी श्रीमद्‌ भागवत महात्म्य व गोकर्ण उपाख्यानाने कथा सप्ताहाला प्रारंभ झाला. रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी नारदपूर्व चरित्र, परीक्षित जन्म व सृष्टी वर्णन, सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी ध्रुव चरित्र, प्रल्हाद चरित्र, वराह अवतार व नृसिंह अवताराचे निरूपण करण्यात आले. मंगळवार, दि. 1 सप्टेंबर रोजी समुद्रमंथन, वामन अवतार व श्रीकृष्ण जन्म, बुधवार, दि. 2 सप्टेंबर रोजी भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला व गोवर्धन लीला, तर गुरुवार, दि. 3 सप्टेंबर रोजी रुक्मिणी स्वयंवर व सुदामा चरित्राचे भावपूर्ण निरूपण झाले.


या कथामालेच्या माध्यमातून भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे महत्त्व, भक्तीची शक्ती, भक्तीमार्ग, श्रीकृष्णाच्या बाललीला तसेच भक्त-संतांच्या जीवनातील आदर्श यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले. कथा ऐकताना भाविक भक्तिरसात तल्लीन झाले. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. शंकर महाराज गणगे यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविकांना भक्तीचा आनंद मिळाला. श्रीकृष्ण जन्माचा प्रसंग साकारताना मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमांना सिंथवादक व गायक ह.भ.प. छगन महाराज मोकाटे, ह.भ.प. दीपक महाराज बनकर, तबलासाथ ह.भ.प. आप्पा म. काळे, ह.भ.प. वैष्णवी ताई कोल्हे तसेच पॅडवादक ह.भ.प. संतोष महाराज सुबे यांनी साथसंगत केली. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी झालेल्या काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. धनंजय महाराज उदावंत यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या आदर्श जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. आजच्या धकाधकीच्या आणि आव्हानात्मक कलियुगात प्रत्येकाने भगवंताचा आधार घेऊन भक्तीच्या मार्गावर वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.


धार्मिक व सामाजिक योगदानातून आत्मिक समाधानाचा मार्ग मिळतो. समाजासाठी चांगले कार्य करताना मनात भक्तीची भावना ठेवणे आवश्‍यक आहे, असे सांगत त्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनातील आदर्श आचरणातून उपस्थितांना प्रेरणा दिली. त्यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. या सोहळ्यास ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, श्री नवनाथ दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प. एकनाथ डोंगरे, गोकुळ जाधव, सागर कापसे, दत्ता फलके, चंद्रकांत जाधव, साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, उपसरपंच किरण जाधव, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, भागचंद जाधव, गोरख फलके, अरुण कापसे, नितीन बोडखे, जालिंदर आतकर, सुरेश जाधव, संभाजी पाचारणे, लक्ष्मण चौरे, कुमार फलके, दादा पाचारणे आदींसह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाच्या सांगतेनंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण सप्ताह यशस्वी करण्यासाठी निमगाव वाघा ग्रामस्थ तसेच भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *