पर्यावरणपूरक सजावटीचा श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचा अभिनव उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सावेडी येथील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या तासाला पर्यावरणपूरक साहित्यापासून गणपतीचे शेकडो आकर्षक मुखवटे तयार केले.
विषयशिक्षक डॉ. अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कागद, पुठ्ठा, दोरा, वापरातील खोकी, लाकूड आदी पर्यावरणात सहज विघटन होणाऱ्या साहित्याचा कल्पकतेने वापर केला. विविध आकार, रंग आणि कलात्मकतेचा वापर करून विद्यार्थ्यांनी गणपतीचे आकर्षक मुखवटे साकारले. गणेशोत्सवात सजावटीसाठी बाजारातील प्लास्टिक अथवा पर्यावरणास घातक साहित्याचा वापर टाळून ‘कचऱ्यातून कला आणि कलेतून पर्यावरण संवर्धन’ हा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या घरगुती गणेशोत्सवात विद्यार्थी स्वतः तयार केलेल्या या पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याचा वापर करणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देतानाच पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि जबाबदारी निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे मुख्याध्यापिका वसुधा जोशी व पर्यवेक्षिका शारदा होशीग,अरुण राशिनकर यांनी कौतुक केले.या उपक्रमासाठी कलाशिक्षक विवेक भारताल आणि स्वाती कु. घुले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या स्वच्छ सर्वेक्षण,शिक्षण मंत्रालयाच्या हरित विद्यालय योजना,पर्यावरण मंत्रालयाच्या मिशन लाइफइको क्लब,माझी वसुंधरा अभियान तसेच मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा अभियान आदी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये प्रशालेचा सक्रिय सहभाग राहावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

