• Sat. Sep 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

भोयरेपठार प्राथमिक शाळेतील शिक्षकाविरोधात ‘खोटे अपंगत्व प्रमाणपत्र’ घेतल्याची तक्रार

ByMirror

Sep 4, 2026
भोयरेपठार प्राथमिक शाळेतील शिक्षकाविरोधात ‘खोटे अपंगत्व प्रमाणपत्र’ घेतल्याची तक्रार

फौजदारी गुन्हा दाखल करून बडतर्फीची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भोयरेपठार येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने कथितरीत्या खोटे अपंगत्व प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप करत, त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करून दोष आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक कार्याध्यक्ष अजय बडोदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अहिल्यानगर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात भोयरेपठार येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकावर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित शिक्षकाने शिक्षकी पेशातील अध्यापनाचे कर्तव्य बाजूला ठेवून पतसंस्थेच्या कामात तसेच पुढारीपणात वेळ घालवत असल्याचा दावा बडोदे यांनी केला आहे. संबंधित शिक्षकाने स्वतःला अर्धांगवायूचा त्रास असल्याचे दाखवून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ते धडधाकट असल्याचा दावा करत या अपंगत्व प्रमाणपत्राच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे.


त्यामुळे संबंधित शिक्षकाची ‘इन-कॅमेरा’ शारीरिक व वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, त्यांना किती टक्के अपंगत्व आहे, ते कायमस्वरूपी आहे की तात्पुरते आहे, याची वैद्यकीयदृष्ट्या पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी बडोदे यांनी केली आहे. अपंगत्व प्रमाणपत्राची अधिकृत वैद्यकीय तपासणी झाल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही विलंब न करता संबंधित शिक्षकाची तपासणी करून अहवालाच्या आधारे योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


निवेदनानुसार, संबंधित शिक्षक हे एका पतसंस्थेचे चेअरमन असून पतसंस्थेचे कामकाज पाहण्यात त्यांचा वेळ जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षकी पेशामध्ये कार्यरत असताना अध्यापनाच्या मूळ जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा बडोदे यांनी केला आहे. संबंधित शिक्षकाच्या वर्गाची प्रत्यक्ष तपासणी करून त्यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे अध्यापन केले आहे की नाही, याची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. वर्गातील अध्यापनाची स्थिती, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच शिक्षकाच्या उपस्थिती व कामकाजाची नोंद यांची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


या प्रकरणासोबतच संबंधित शिक्षकाच्या कथित बेहिशेबी स्थावर मालमत्तेची, पतसंस्थेच्या माध्यमातून मिळविलेल्या संपत्तीची तसेच आयकरासंदर्भातील व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरपीआयचे युवक कार्याध्यक्ष अजय बडोदे यांनी केली आहे. सदर मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास 8 सप्टेंबर 2026 रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *