• Sun. Aug 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाई सथ्था नाईट हायस्कूलने ‘शिक्षणदूत’ अभियानातून 168 विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले!

ByMirror

Aug 30, 2026
भाई सथ्था नाईट हायस्कूलने ‘शिक्षणदूत’ अभियानातून 168 विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले!

सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशित करणाऱ्यांचा गौरव; मासुम संस्थेच्या सर्व्हेनुसार राज्यातील सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेली रात्र शाळा


शिक्षणदूत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;‘मी शिकलो, तुम्ही शिका!’चा संदेश देत शिक्षणदूतांनी उपलब्ध केली शिक्षणाची पुन्हा संधी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विविध कारणांमुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘शिक्षणदूत’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत शाळाबाह्य तसेच अर्धवट शिक्षण सोडलेल्या तब्बल 168 विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी 49, तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 119 विद्यार्थ्यांना प्रवेशित केले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशित करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.


शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी शिक्षण प्रसार व जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून ‘शिक्षणदूत’ उपक्रम राबविण्यात आला. या शोध मोहिमेत आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना रात्रशाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. दरम्यान, मुंबई येथील मासुम संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार भाई सथ्था नाईट हायस्कूल ही सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेली राज्यातील क्रमांक एकची शाळा ठरली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रात्रशाळेत शिक्षण घेण्यासाठी विविध भागांतून विद्यार्थी येत असून, काम, व्यवसाय तसेच अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शाळा शिक्षणाची महत्त्वपूर्ण संधी ठरत आहे.


या पार्श्‍वभूमीवर हिंद सेवा मंडळाचे नूतन अध्यक्ष ॲड. अनंत फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे उपस्थित होते. यावेळी भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, संस्थेचे उपाध्यक्ष व शालेय समिती सदस्य विलास बडवे, संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, प्राचार्य सुनील सुसरे आदींसह शालेय शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी ‘शिक्षणदूत’ अभियानाची भूमिका स्पष्ट केली. अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा विद्यार्थ्यांना राहिलेले शिक्षण रात्रशाळेत पूर्ण करण्याची संधी आणि प्रोत्साहन दिले जात आहे. भाई सथ्था नाईट हायस्कूलची राज्यातील सर्वात मोठी रात्रशाळा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले की, शिक्षण हा तिसरा डोळा असून, मनुष्याला विकासाची दृष्टी मिळते. शिक्षणातून चांगला माणूस घडतो. रात्रशाळेत काम करून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. आजच्या ऑनलाइनच्या युगातही वर्गातील प्रत्यक्ष शिक्षणाचे महत्त्व कमी झालेले नाही. शिक्षक हा विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम करत असतो. शिक्षणातून विकास होऊन प्रतिष्ठा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ॲड. अनंत फडणीस म्हणाले की, राज्यात सर्वाधिक विद्यार्थी असल्याचा मान भाई सथ्था नाईट हायस्कूलने मिळवला आहे. ‘शिक्षणदूत’ या उपक्रमातून अनेक गरजू घटक पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. बाहेरगावातून रात्र शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्याचा प्रयत्न व्यवस्थापन समितीशी चर्चा करून केला जाणार आहे. मासुम संस्थेचे सहकार्य तसेच विविध कृतीशील उपक्रमांच्या माध्यमातून प्राचार्य सुनील सुसरे यांनी शाळेचे नाव राज्यात उंचावले असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मी शिकलो, तुम्ही शिका!’ ही भूमिका घेऊन रात्र शाळेतील आजी-माजी विद्यार्थी ‘शिक्षणदूत’ उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार-प्रसार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अजित बोरा यांनीही भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या कार्याचे कौतुक केले. ‘शिक्षणदूत’ अभियानामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येता आले असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणदूत अभियानांतर्गत सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशित करण्याची स्पर्धा आजी-माजी विद्यार्थी गट तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी गट अशा दोन गटांत घेण्यात आली होती. यामध्ये शिक्षक गटातून प्रथम क्रमांक शिवप्रसाद शिंदे, द्वितीय क्रमांक शरद पवार, तर तृतीय क्रमांक अमोल कदम यांनी मिळविला.
विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक माई फाजगे-खरे व प्रदीप भोसले, द्वितीय क्रमांक ज्योती गायकवाड ( पगारे), अनिल दिवे, आरती लबडे (गावडे) शितल पन्हाळे ( घोडके), तर तृतीय क्रमांक दीपक वाघमारे यांनी मिळविला. सर्व विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष व शालेय समिती सदस्य विलास बडवे यांनी शिक्षणदूत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले.


हिंद सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड. अनंत फडणीस यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल रात्रशाळेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या त्रिशला सरवदे, माई फाजगे, सारिका गुजेट्टी, अमित भोज, अनिल दिवे या विद्यार्थ्यांनी आपले अनुभवही व्यक्त केले. रात्रशाळेत शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याचे सांगताना काही विद्यार्थ्यांनी शिक्षणामुळे जीवनाला नवी दिशा मिळाल्याचे स्पष्ट केले. पती-पत्नीने एकत्र शिक्षण घेऊन दहावी उत्तीर्ण झाल्याचा अनुभवही एका विद्यार्थ्याने विशद केला. लहानपणीच विवाह झाल्यामुळे शिक्षण घेता आले नाही; मात्र आता रात्रशाळेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.


कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय महादेव राऊत यांनी करून दिला. स्वागत प्राचार्य सुनील सुसरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली साताळकर यांनी केले, तर आभार मंगेश भुते यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *