• Fri. Aug 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या विद्यार्थ्यांच्या हातून तयार झालेल्या राख्या थेट सरहद्दीवर तैनात जवानांकडे!

ByMirror

Aug 27, 2026
विद्यार्थ्यांचा जवानांना रक्षाबंधनाचा भावनिक संदेश

‘दिल से सरहद तक’ उपक्रमातून रक्षाबंधनाची अनोखी भेट; राखी बनवा कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


विद्यार्थ्यांचा जवानांना रक्षाबंधनाचा भावनिक संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधनाचा आनंद, गोडवा आणि स्नेह सरहद्दीवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या आकर्षक राख्या सरहद्दीवर देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना पाठविल्या आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘राखी बनवा कार्यशाळे’त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अहिल्यानगर लायन्स क्लब, लिओ क्लब आणि घर घर लंगर सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने ‘दिल से सरहद तक’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रेमाने आणि आपुलकीने तयार केलेल्या राख्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्टाने पाठविण्यात आल्या. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या हाताने तयार केलेली राखी मिळावी, या भावनेतून विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.


राखी बनवा कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे दोरे, मणी, झिरमिळ्या, रंगीत कागद, फेटी तसेच विविध कलात्मक साहित्याचा वापर करून अत्यंत सुंदर, आकर्षक आणि कल्पक राख्या तयार केल्या. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पनेनुसार राखी तयार करताना त्यामागील भावनाही जपल्या. ही राखी आपल्या भावाला बांधण्यासाठी नसून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर खंबीरपणे उभ्या असलेल्या जवानांसाठी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यामुळे राखी तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले.


‘आपण सुरक्षित आहोत, कारण जवान सीमेवर जागता पहारा देत आहेत’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या छोट्याशा कृतीतून जवानांप्रती असलेला सन्मान, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त झाली. या कार्यशाळेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी केवळ राख्या तयार केल्या नाहीत, तर भारतीय संस्कृतीतील रक्षाबंधनाचे महत्त्वही समजून घेतले.


रक्षाबंधनातील ‘रक्षा’ आणि ‘बंध’ या दोन शब्दांचा अर्थ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून अनुभवला. एकीकडे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि संरक्षणाची भावना, तर दुसरीकडे देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांप्रती असलेला सन्मान, अशी या उपक्रमाची भावनिक सांगड घालण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच भारतीय सण, परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या राख्या भारतीय जवानांना पाठविणे हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आपल्या कुटुंबापासून दूर राहून ऊन, वारा, पाऊस आणि कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांनी तयार केलेली प्रत्येक राखी ही केवळ सजावटीची वस्तू नसून त्यामध्ये जवानांप्रती प्रेम, आदर, कृतज्ञता आणि ‘देश तुमच्यासोबत आहे’ हा भावनिक संदेश सामावलेला असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुला-मुलींनी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आपल्या हातांनी राख्या तयार केल्या. विविध रंगसंगती, मणी, झिरमिळ्या आणि कलात्मक साहित्याचा वापर करत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा सुंदर आविष्कार घडविला. विशेष म्हणजे तयार केलेल्या राख्या सरहद्दीवर तैनात असलेल्या जवानांना पाठविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाला देशभक्तीची भावनिक जोड मिळाली.


कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यशाळेत शाळेतील शिक्षिका मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, सोनाली अनभुले, रूपाली वाबळे, कांचन मदने, भारती सुसरे, भाग्यश्री लोंढे, कविता हिरणवाळे, इंदुमती दरेकर, पुनम धाडगे, रूपाली पांडुळे, सौ. जगताप, बिडवे मावशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *