• Thu. Aug 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

साईनगरी, फुलारी मळा परिसरातील रस्त्याच्या खडीकरण कामाला सुरुवात

ByMirror

Aug 27, 2026
साईनगरी, फुलारी मळा परिसरातील रस्त्याच्या खडीकरण कामाला सुरुवात

आमदार अक्षय कर्डिले यांच्या सहकार्यातून विकासकाम मार्गी; नागरिकांची पावसाळ्यातील गैरसोय होणार दूर


आलमगीर मदरसा ते विजय लाईन चौक मुख्य रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार -संजय सपकाळ


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आलमगीर रोड येथील साईनगरी व फुलारी मळा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार अक्षय कर्डिले यांच्या सहकार्यातून हे विकासकाम मार्गी लागले असून, या कामामुळे परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.


या विकासकामाचे उद्घाटन सौ. प्रांजली सर्वेश सपकाळ आणि नागरदेवळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोनू भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, ग्रामसेवक भाऊसाहेब भाबड, ग्रामपंचायत सदस्य अजय गारदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साईनगरी व फुलारी मळा परिसरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल, खड्डे आणि पाणी साचत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार तसेच शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्‍वभूमीवर रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


ग्रामसेवक भाऊसाहेब भाबड यांनी यावेळी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येत आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता तसेच इतर आवश्‍यक विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांचे सहकार्य आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मिळणारे पाठबळ यामुळे गावातील विकासकामांना गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. गावातील नागरिकांना आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे. उपलब्ध निधी आणि विविध योजनांच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


उपसरपंच सोनू भुजबळ यांनी सांगितले की, नागरदेवळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यानुसार विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. गावातील प्रलंबित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे विकासकामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.


हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजयजी सपकाळ यांनी सांगितले की, आलमगीर मदरसा ते विजय लाईन चौक हा परिसरातील महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या कामासाठी आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, या मुख्य रस्त्याचे कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्त्याच्या खडीकरणासोबतच मुख्य रस्त्याच्या प्रस्तावित कामामुळे परिसराच्या विकासाला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. रस्त्याच्या खडीकरणाच्या कामामुळे परिसरातील महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व खड्ड्यांमुळे ये-जा करणे कठीण होत होते. त्यामुळे दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांसह विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता रस्त्याचे काम सुरू झाल्याने ही गैरसोय कमी होणार असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सुरू असलेल्या विकासकामाची पाहणी केली. रस्त्याचे खडीकरण करताना कामाचा दर्जा चांगला राखावा आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या. विकासकामाचा फायदा दीर्घकाळ नागरिकांना मिळावा, यासाठी कामात कोणतीही तडजोड न करता दर्जेदार पद्धतीने काम करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. या रस्त्यासाठी सरपंच राम पानमळकर यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजय गारदे, जहीर सय्यद, गुलाम दस्तगीर बब्बू भाई, राजेश माळगे, किसनराव गोरखे, सतीश फुलारी, मास्टर ईवान सपकाळ, ओम माळगे, देवा गोरखे, विवेक बिडवाई, आदित्य मंडलिक, हाजी अफजल सय्यद, फिरोज शेख, प्रथमेश रासकर, अभिजीत चव्हाण, संगीताताई सपकाळ, माधवी माळगे, अनिता शेलार, मंगल धाडगे, सुमनताई चवरे, सुरेखा रासकर, रेखा मंडलिक, अश्‍विनी गोरखे, नलिनी चव्हाण, राधिका चव्हाण, महिमा माळगे, सोनिया चव्हाण, संतोष फुलारी, फुलारी आज्जी, जिजाबाई फुलारी तसेच साईनगरी परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *