‘बुमरो’ गाण्यावर चिमुकल्यांचा देशभक्तीचा जागर; ‘मिशन सिंदूर’मधील प्रसंग नृत्यातून साकारत विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने
विविध शाळांच्या सहभागातून रंगलेल्या देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेत दमदार कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समृद्धी वुमन्स मल्टीपर्पज सोसायटी संचलित भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री-प्रायमरी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेत आपल्या कलागुणांची दमदार छाप उमटवत लहान गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. माय भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि उडाण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री-प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘बुमरो’ या गाण्यावर आकर्षक देशभक्तीपर नृत्य सादर केले. नृत्याच्या माध्यमातून ‘मिशन सिंदूर’मधील विविध प्रसंग प्रभावीपणे साकारण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, नृत्यातील समन्वय, देशभक्तीची भावना आणि सादरीकरणातील उत्साह यामुळे त्यांच्या नृत्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. विशेषतः देशाच्या शौर्याचे आणि सैनिकांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणाऱ्या प्रसंगांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वयाच्या मानाने अत्यंत आत्मविश्वासाने केलेले नृत्यसादरीकरण हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. गाण्याच्या तालावर अचूक पावले, आकर्षक हालचाली आणि ‘मिशन सिंदूर’चा आशय प्रभावीपणे मांडत विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची भावना जागविली. त्यांच्या या उल्लेखनीय सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांनी लहान गटामध्ये स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री-प्रायमरी शाळेला द्वितीय क्रमांक जाहीर केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती डोमकावळे, शालेय शिक्षिका धनश्री काळे (नृत्यदिग्दर्शिका), सविता सब्बन, सायली गायकवाड, शिल्पा भगत आणि समृद्धी डोमकावळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शबनम शेख, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रशांत साळुंके, मेहेरबाबा संस्थेचे विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, जयश्री शिंदे, उडाण फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री-प्रायमरी शाळेचे आदित्य गायकवाड, हर्ष वाघमोडे, आदित्य पारखे, शंकरषण चोपडे, निमिष साबळे, श्रद्धा गिते, नाविन्या काटे, रिद्धी भाळके, शिवन्या थोरवे, खुशी निकाळजे, आरुष पाडोळे, वरद सब्बन, ईशान सब्बन आणि अयंश गायकवाड या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल पालकांमधून अभिनंदन होत आहे.

