लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक सहविचार सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; इयत्ता चौथीचा सरफराज शेख शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 11वा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया असते. याच टप्प्यावर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि विविध गुण विकसित होत असतात. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असली, तरी मातृभाषेतूनही विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येते. आज विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत असलेले अनेक अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती मराठी माध्यमातूनच घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारच्या मोफत शिक्षणाच्या सुविधेचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी शाळा व शिक्षकांना सहकार्य करावे; मात्र मुलांवर अपेक्षांचे अनावश्यक ओझे लादू नये, असे आवाहन महापौर ज्योतीताई गाडे यांनी केले.
शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयात पालक-शिक्षक सहविचार सभा उत्साहात पार पडली. यावेळी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात महापौर ज्योतीताई गाडे बोलत होत्या.
यावेळी जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, स्कूल कमिटी सदस्य शामराव व्यवहारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कैलास लोंढे, राजमुद्रा अकॅडमीच्या संचालिका सौ. नंदाताई पांडुळे, इमरान तांबोळी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, माध्यमिकचे प्रभारी मुख्याध्यापक महादेव भद्रे यांच्यासह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी लक्ष्मीबाई व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांनी पालक-शिक्षक सहविचार सभेत पालकांशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीपासून ते पोषण आहार, आरोग्य, आहाराच्या सवयी तसेच विविध परीक्षांची तयारी या विषयांवर संवाद साधला. विद्यार्थ्यांची केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे हा शाळेचा उद्देश नसून त्यांच्या आहार, आरोग्य, शारीरिक व मानसिक विकासाकडेही शाळेच्या माध्यमातून विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने घडविण्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात ज्ञानदेव पांडुळे यांनी रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जात नसल्याचे सांगितले. प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना घडविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरावर चमकत आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाची आणि शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण कार्याची प्रभावीपणे मांडणी व मार्केटिंग करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करून तसेच काळाची गरज ओळखून संस्थेच्या माध्यमातून अद्ययावत शिक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने शिक्षणपद्धतीत आवश्यक बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कैलास लोंढे यांनी शैक्षणिक प्रबोधनाबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी हे सर्वप्रथम आपल्या पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या वर्तनातून मुलांसमोर योग्य आदर्श निर्माण करावा आणि जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांनीही कार्यक्रमाला भेट देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीबरोबरच पालक, शिक्षक आणि शाळेच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे तसेच माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सरफराज शेख याने राज्यात 11वा क्रमांक पटकावला असून, तब्बल 29 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तसेच प्रज्ञाशोध परीक्षेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. आभार मंगेश कारखिले यांनी मानले.

