न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचाही सहभाग; तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार व्यासपीठ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ‘माय भारत’ आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी आभासी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर (स्वायत्त) आणि संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर (स्वायत्त) या दोन निवडक महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक आणि तरुणांसह राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांशी आभासी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून, खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि सक्रिय सहभागाचे महत्त्व याबाबत तरुणांना मार्गदर्शन मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना यशस्वी खेळाडूंच्या अनुभवातून प्रेरणा घेता येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील समर्पण, शिस्त, चिकाटी, तंदुरुस्ती आणि उत्कृष्टतेचे महत्त्वही त्यांना समजून घेता येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या स्वयंसेवकांना तरुणांमध्ये खेळ, तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रम, सामुदायिक तंदुरुस्ती कार्यक्रम, जनजागृती मोहिमा, सर्वसमावेशक क्रीडा उपक्रम तसेच तरुणांच्या नेतृत्वाखाली राबविता येणारे विविध तंदुरुस्ती उपक्रम यांचा समावेश असू शकतो.
प्राप्त झालेल्या सर्वोत्तम व नाविन्यपूर्ण कल्पनांची निवड करून राष्ट्रीय स्तरावर त्यांचा विचार व अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे तरुणांना केवळ राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची नव्हे, तर देशातील क्रीडा व तंदुरुस्ती चळवळीला बळकटी देण्यासाठी आपल्या कल्पनांचे योगदान देण्याची संधी मिळणार आहे.
भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील सदर दोन्ही महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

