बिरोबा मंदिरात विधीवत पूजा, होम-हवन व अभिषेक; भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरण
ढोलपथकासह गावातून उत्सवमूर्तीची मिरवणूक; ह.भ.प. प्रा. सुरेश महाराज खेत्रे यांचे संत बाळू मामांच्या चरित्रावर प्रवचन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे श्री संत बाळू मामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना बिरोबा मंदिरात मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. विधीवत पूजा, होम-हवन व अभिषेकाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
देवस्थानचे भगत नामदेव भुसारे व पुरोहित नारायण देवा औटी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात धार्मिक विधी पार पडले. मंत्रोच्चाराच्या गजरात श्री संत बाळू मामांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. होम-हवनानंतर मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.
या मूर्तीची भेट अनिरुद्ध अडसुळ परिवाराच्या वतीने देण्यात आली. मुर्तिकार भगवान जगताप यांनी आकर्षक व देखणी श्री संत बाळू मामांची मूर्ती साकारली आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त उत्सवमूर्तीसह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक ढोलपथकाच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मिरवणुकीदरम्यान भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. ‘संत बाळू मामा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. महिला भाविकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत धार्मिक उत्सवाचा आनंद घेतला.
यानिमित्त ह.भ.प. प्रा. सुरेश महाराज खेत्रे यांच्या कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून संत बाळू महाराजांचे जीवनचरित्र, त्यांचे कार्य, भक्ती व समाजाला दिलेला संदेश याबाबत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या कथेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्यास डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, बाबा जाधव, पांडूरंग गुंजाळ, गोकुळ जाधव, साहेबराव बोडखे, अतुल फलके, सागर कापसे, अरुण कापसे, जालिंदर जाधव, बाबा पुंड, संजय कापसे, शिवाजी पुंड, नारायण शिंदे, रामदास वाखारे, ठकाराम शिंदे, सुनील जाधव, गुलाब जाधव, युवराज भुसारे, निलेश भुसारे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. भाविकांनी संत बाळू मामांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. अखेर भंडाऱ्याने या धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात आली.

