भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष; पोतराजांच्या आसूडच्या फटक्यांचा आवाज घुमला
पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी परिसरात लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रामवाडी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेत महिला, युवक, पोतराज तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण रामवाडी परिसर लक्ष्मीमातेच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
या यात्रेला तब्बल 50 वर्षांची परंपरा असून, दरवर्षी रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या यात्रेतही पारंपरिक धार्मिक परंपरा जपत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या निमित्ताने परिसरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. युवकांनी प्रवरा संगम येथून कावडीद्वारे आणलेल्या पवित्र जलाने रामवाडी येथील लक्ष्मीमातेच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. विधिवत पूजा-अर्चा करून लक्ष्मीमातेच्या उत्सवमूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेतले.
शोभायात्रेत संबळ, हलगी, ढोल आणि ताशांच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. पारंपरिक वेशभूषेतील पोतराजांनी देवीप्रती श्रद्धा व्यक्त करत पारंपरिक पद्धतीने आसूडचे फटके ओढले. आसूड ओढताना होणारा ‘चट्ट… चट्ट…’ आवाज परिसरात घुमत होता. या पारंपरिक सादरीकरणामुळे यात्रेचे विशेष आकर्षण वाढले.
यात्रेनिमित्त माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे हे वर्षातून एकदा पोतराजाचा साज चढवून लक्ष्मीमातेला अभिवादन करतात आणि यात्रेत सहभागी होतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बबन लोखंडे, लखन लोखंडे, गणेश गायकवाड, लक्ष्मण नवगिरे, रोहित शेलार, ऋतिक शेरकर, गोपाल शिंदे, कैलास शिंदे आदी पोतराजांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी वाजंत्री म्हणून राहुल वैरागर, विशाल वैरागर, यादव खुडे, सागर खुडे, संजय चांदणे आदी सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
शोभायात्रेत परिसरातील महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. कपाळी गंध लावलेल्या कलशधारी महिलांची शिस्तबद्ध उपस्थिती लक्षवेधी ठरली. तसेच घोड्यांच्या बग्गीत विराजमान असलेल्या लक्ष्मीमातेच्या उत्सवमूर्तीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेदरम्यान भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. ‘लक्ष्मीमातेचा विजय असो’, ‘लक्ष्मीआईचा जयजयकार’ अशा जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. युवकांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभाग घेतला.
रामवाडी परिसरातून सुरू झालेली ही शोभायात्रा कोठला, मंगलगेट, सर्जेपूरा आणि रंगभवन मार्गे मार्गक्रमण करत पुन्हा रामवाडी येथे पोहोचली. तेथे शोभायात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला. पाच दशकांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा आजही त्याच उत्साहाने जपली जात असल्याने रामवाडीतील लक्ष्मीआई यात्रा हा शहरातील एक महत्त्वाचा पारंपरिक धार्मिक उत्सव ठरत आहे. युवकांचा उत्स्फूर्त सहभाग, महिलांची उपस्थिती आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे यंदाच्या यात्रेला विशेष रंगत आली.

