• Fri. Aug 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा शनिवारी महासंग्राम

ByMirror

Aug 20, 2026
सेंट मायकल स्कूलची दुहेरी विजयी आगेकूच

आठही संघांची विजेतेपदासाठी जोरदार तयारी;


शुक्रवारपासून तिसऱ्या क्रमांकासाठी रंगणार सामने


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील विविध गटांतील अंतिम तसेच तिसऱ्या क्रमांकासाठीचे सामने शुक्रवार (दि. 21 ऑगस्ट) आणि शनिवार (दि. 22 ऑगस्ट) रोजी अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहेत. उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतील अटीतटीच्या सामन्यांनंतर आता स्पर्धेतील विजेतेपदासाठी अंतिम लढती होणार असल्याने फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या स्पर्धेत 12 वर्षांखालील मुले, 14 वर्षांखालील मुले, 16 वर्षांखालील मुले तसेच 16 वर्षांखालील मुली अशा चार गटांमध्ये सामने खेळविण्यात आले. विविध शाळांच्या संघांनी सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे प्रत्येक गटातील अंतिम सामना चुरशीचा आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे.


शुक्रवारी (दि. 21 ऑगस्ट) विविध गटांतील तिसऱ्या क्रमांकासाठीचे सामने खेळविण्यात येणार आहेत. 16 वर्षांखालील मुलींच्या गटात श्रीसाई इंग्लिश मीडियम स्कूल आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांतील खेळाडू तिसरे स्थान मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.


12 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल आणि आयकॉल पब्लिक स्कूल यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होणार आहे. तर 14 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यांमध्ये विजय मिळवून स्पर्धेत मानाचे स्थान मिळविण्यासाठी दोन्ही संघांकडून जोरदार खेळाची अपेक्षा आहे.
शनिवार (दि. 22 ऑगस्ट) हा स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार असून, चारही गटांतील अंतिम सामने याच दिवशी खेळविण्यात येणार आहेत. 16 वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मागील वर्षी प्रवरा पब्लिक स्कूलने या गटाचे विजेतेपद पटकाविले होते. यंदाही प्रवरा पब्लिक स्कूलने अंतिम फेरी गाठत आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी सज्जता केली आहे. दुसरीकडे आर्मी पब्लिक स्कूलचा संघही संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे मुलींच्या गटातील हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.


12 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील स्कूल विरुद्ध सेंट मायकल स्कूल यांच्यात विजेतेपदासाठी सामना होणार आहे. मागील वर्षी आठरे पाटील स्कूलने विजेतेपद मिळविले होते. यंदा या संघासमोर सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या सेंट मायकल स्कूलचे आव्हान असणार आहे. त्यामुळे गतविजेत्यांना विजेतेपद राखण्यासाठी सेंट मायकलच्या आक्रमक खेळाला सामोरे जावे लागणार आहे.


14 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट मायकल स्कूल असा अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी अंतिम सामन्यात स्थान मिळवू न शकलेले हे दोन्ही संघ यंदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचले असून, यंदाच्या स्पर्धेत आपली छाप उमटविण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.
16 वर्षांखालील मुलांच्या गटात सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल असा विजेतेपदाचा सामना होणार आहे. मागील वर्षी आर्मी पब्लिक स्कूलला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा पुन्हा अंतिम फेरी गाठत आर्मी पब्लिक स्कूलने विजेतेपदासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील वर्षीची हुरहूर भरून काढत यंदा विजेतेपद पटकाविण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलचा संघही स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. दोन्ही संघ फॉर्ममध्ये असल्याने या सामन्यात मैदानावर वेगवान पासिंग, आक्रमक चाली आणि बचावफळीतील संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी आठरे पाटील स्कूल आणि प्रवरा पब्लिक स्कूल यांच्यात सामना होणार आहे. आठरे पाटील स्कूल हा मागील वर्षीचा विजेता संघ असून, या संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले होते. त्यामुळे यंदा अंतिम फेरी हुकल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी आठरे पाटील स्कूल मैदानात उतरणार आहे. चारही गटांतील अंतिम सामन्यांमुळे स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर युवा फुटबॉलपटूंच्या कौशल्याचा खेळ पाहायला मिळणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *