• Wed. Aug 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

अल्ताफ सय्यद यांचा राजर्षी शाहू महाराज समाजरत्न पुरस्काराने गौरव

ByMirror

Aug 4, 2026
अल्ताफ सय्यद यांचा राजर्षी शाहू महाराज समाजरत्न पुरस्काराने गौरव

दोन दशकांचे निस्वार्थ सामाजिक कार्य आणि सामाजिक ऐक्याच्या उपक्रमाची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात माणुसकी, ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देत गेली दोन दशके निस्वार्थ सामाजिक कार्य करणारे मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आषाढी एकादशी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जगतगुरू संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात सय्यद यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, स्वागताध्यक्ष ॲड. आनंद सूर्यवंशी, संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सूर्यवंशी, अनिताताई खरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांच्यासह साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अल्ताफ सय्यद हे गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून, समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याची मोठी दखल घेण्यात आली होती. संकटाच्या कठीण काळात अनेक कुटुंबांपर्यंत अन्नधान्य, जीवनावश्‍यक वस्तू आणि आर्थिक मदत पोहोचवून त्यांनी हजारो नागरिकांना आधार दिला.


शरद पवार विचार मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेपासून त्यांनी फ्रंटलाइन वर्कर्ससाठीही मोठे योगदान दिले. बूथ हॉस्पिटलला आवश्‍यक साहित्य पुरविणे, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एनर्जी ड्रिंक, मास्क, सॅनिटायझर आणि इतर आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी संकटकाळात समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली.


समाजात वाढत चाललेल्या जातीय आणि धार्मिक द्वेषाच्या पार्श्‍वभूमीवर अल्ताफ सय्यद यांनी ‘मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून समाजात ऐक्य, बंधुता आणि माणुसकीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन सर्वसामान्यांना मदत आणि आधार देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जात आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक मदत, शालेय साहित्य वाटप, मार्गदर्शन शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अल्ताफ सय्यद सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *