• Sat. Sep 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरच्या अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारात 21 सप्टेंबरला गुरुपुरब सोहळा

ByMirror

Sep 19, 2026
अहिल्यानगरच्या अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारात 21 सप्टेंबरला गुरुपुरब सोहळा

तारकपूर येथे शेड व फरशी कामाचे लोकार्पण; लोकप्रतिनिधींसह सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारा येथे बाबा श्रीचंद महाराज गुरुपुरबनिमित्त रविवार, दि. 20 सप्टेंबर आणि सोमवार, दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय सोहळ्यात आरती, गुरबाणी कीर्तन, शब्द, आनंद साहेब, अरदास, हुकमनामा तसेच गुरू का लंगर आदी कार्यक्रम होणार आहेत.


बाबा श्रीचंद महाराज हे श्री गुरु नानक देव जी यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून उदासी परंपरेचे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांनुसार त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1494 रोजी सुलतानपूर लोधी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म, योग, साधना आणि वैराग्याची ओढ होती. पुढे त्यांनी उदासी परंपरेच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांचा प्रसार केला.
बाबा श्रीचंद महाराजांनी विविध प्रदेशांत भ्रमण करून अध्यात्म, ज्ञान, साधना आणि मानवकल्याणाचा संदेश दिल्याची परंपरा आहे. त्यांच्या परंपरेशी संबंधित अनेक डेरे, आश्रम, गुरुद्वारे आणि धार्मिक केंद्रे पुढे देशाच्या विविध भागांत निर्माण झाली. त्यांच्या जीवनाशी संबंधित बारठ साहिबसह अनेक स्थळांना आजही धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. अहिल्यानगरमधील अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारा हा या आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपणारे श्रद्धास्थान आहे. गुरुपुरबच्या निमित्ताने गुरुद्वारा परिसरात भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या शेड व फरशीच्या कामाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.


या कामासाठी मा. माजी खासदार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून सहकार्य लाभले आहे. या कार्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गुरुद्वाराच्या विकासासाठी सहकार्य व पाठबळ दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, मा. उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, नगरसेविका हरप्रीतकौर गंभीर, मोहित पंजाबी आणि गौरी अमित बोरकर यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.


रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत दीवान कार्यक्रम. दुपारी 12.00 वाजता बाबा श्रीचंद महाराज जी यांची आरती. आरतीनंतर शब्द, आनंद साहेब, अरदास, हुकमनामा व गुरू का लंगर होणार आहे.
सोमवारी बाबा श्रीचंद महाराज गुरुपुरब साजरा होणार आहे. सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 गुरबाणी कीर्तन हजुरी रागी जथा भाई दयासिंहजी, दुपारी 12.00 वाजता लोकार्पण सोहळा व विशेष सत्कार समारंभ यानंतर शब्द, आनंद साहेब, अरदास, हुकमनामा व गुरू का लंगर होणार असून दुपारी 1.00 वाजता कार्यक्रमाची सांगता होईल.


या पवित्र गुरुपुरब सोहळ्यास अहिल्यानगर शहरातील तसेच परिसरातील सर्व भाविक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी वीराजी वाही, राजेंद्र कंट्रोड, जनक आहुजा, सतीश गंभीर, अमित थापर, किशोर कंट्रोड, जगजीतसिंह गंभीर, बलराम सचदेव, अवतार गुरली, चरणजीतसिंह गंभीर, हरजीतसिंग वाधवा, निप्पू धुप्पर, राजू जग्गी, पूनम खुल्लर, रेखा गुलाटी, लखू माटलाई आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *