• Sat. Sep 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

टाकळीभान अपघातातील मृत्यूचा निष्पक्ष तपास करा; दोषींवर कारवाईची शिवसेनेची मागणी

ByMirror

Sep 19, 2026
राहुल जाधव मृत्यू प्रकरणात तपासावर दबावाचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

राहुल जाधव मृत्यू प्रकरणात तपासावर दबावाचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी


पाच महिने उलटूनही तपासाबाबत कुटुंबीय असमाधानी; कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषणाचा इशारा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- टाकळीभान शिवारात 10 एप्रिल 2026 रोजी झालेल्या रस्ता अपघातात नवनाथ उर्फ राहुल प्रकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि वेळबद्ध तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच तपासावर कोणत्याही प्रकारचा दबाव अथवा हस्तक्षेप होत असल्याचे आढळल्यास संबंधितांची चौकशी करून पुराव्यानुसार त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना देण्यात आले.


सामाजिक न्याय विभाग शिवसेना जिल्हाध्यक्ष (दक्षिण) विनोद साळवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष दीपक कांबळे, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, विशाल जगताप, ज्ञानेश्‍वर आव्हाड, समर्थ जावने, मनोज गायकवाड, किरण गायकवाड, आकाश जाधव, प्रमोद जंजाळे, मालन जाधव, राजू कांबळे, सोमनाथ मगरे, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.


निवेदनात म्हटले आहे की, 10 एप्रिल 2026 रोजी टाकळीभान शिवारातील आर्या पेट्रोल पंपाजवळ झालेल्या रस्ता अपघातात नवनाथ उर्फ राहुल प्रकाश जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाचा भाऊ आकाश प्रकाश जाधव यांनी 15 एप्रिल 2026 रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तसेच त्यांच्या निदर्शनास आलेल्या पुराव्यांच्या आधारे सदर अपघातात स्कोडा कार क्रमांक MH 12 LJ 9247 चा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे वाहन दत्तात्रय दळे चालवत असल्याचे कुटुंबीयांना समजल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या बाबींची पोलिसांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


घटनेला जवळपास पाच महिने उलटूनही तपासाबाबत समाधानकारक प्रगती झालेली नसल्याची तक्रार मृतकाच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत करण्यात आलेली कार्यवाही आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा याबाबत कुटुंबीयांना लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात तपासावर दबाव किंवा हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. वाहनचालक यांच्या पत्नी या श्रीरामपूर येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्या पदाचा अथवा शासकीय संबंधांचा वापर करून पोलिसांच्या तपासावर दबाव किंवा प्रभाव टाकला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.


मात्र, या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून त्यातील तथ्य तपासावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. तपासादरम्यान कोणत्याही व्यक्तीकडून दबाव, हस्तक्षेप किंवा आरोपीला मदत केल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाल्यास, संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच तपासातून निष्पन्न होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे संबंधितांची आरोपी अथवा सहआरोपी म्हणून भूमिका निश्‍चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


अपघात प्रकरणाचा तपास करताना घटनास्थळ व परिसरातील CCTV फुटेज तपासावे, घटनास्थळाचा पंचनामा, वाहनांचे तांत्रिक परीक्षण, प्रत्यक्षदर्शींचे जबाब तसेच इतर उपलब्ध पुरावे संकलित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे, वाहनाच्या नुकसानीचा अहवाल, वैद्यकीय अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल यांची सखोल पडताळणी करावी. उपलब्ध सर्व पुराव्यांची परस्पर पडताळणी करून अपघाताची नेमकी परिस्थिती आणि जबाबदारी निश्‍चित करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


राहुल जाधव यांच्या मृत्यू प्रकरणात दोषी व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली नाही आणि निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे उपोषण करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *