• Sat. Sep 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

काळी आई मुक्ती आंदोलना’चा एल्गार; 23 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

ByMirror

Sep 19, 2026

वननिवासी शेतकरी व कुटुंबांवरील अन्यायाविरोधात आंदोलनाची हाक


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याला जवळपास आठ दशके पूर्ण होत आली असतानाही देशातील आर्थिक व सामाजिक विषमता अपेक्षित प्रमाणात कमी झालेली नाही. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेचे केंद्रीकरण कायम असल्याने वननिवासी शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना विविध प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर वननिवासी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी बुधवार, 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स हेल्पलार्इन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ‘काळी आई मुक्ती आंदोलन’ करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


वननिवासी शेतकरी हे पिढ्यान्‌पिढ्या जमिनीशी आणि निसर्गाशी जोडलेले असूनही त्यांना त्यांच्या हक्कांबाबत पुरेशी कायदेशीर माहिती, शिक्षण आणि संघटित शक्ती उपलब्ध झाली नाही. त्यांच्या या असहायतेचा गैरफायदा घेतला गेला. परिणामी अनेक कुटुंबांना अन्याय, असुरक्षितता आणि उपजीविकेच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
“यापुढे वननिवासी शेतकऱ्यांवरील अन्याय एक दिवसही सहन केला जाणार नाही,” असा निर्धार पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केला आहे. वननिवासी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. गवळी म्हणाले की, “काळी आईशी प्रामाणिक नाते जपणाऱ्या वननिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांचा सन्मान, अधिकार आणि उपजीविका सुरक्षित करणे हे शासनाचे घटनात्मक कर्तव्य आहे.” या आंदोलनाच्या माध्यमातून वननिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या आंदोलनाच्या माध्यमातून वननिवासी शेतकरी व त्यांच्या कुटुंबांच्या हक्कांकडे शासनाचे लक्ष वेधण्याबरोबरच त्यांच्या प्रश्‍नांवर ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली जाणार आहे. शासनाने या कुटुंबांच्या समस्या गांभीर्याने घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.


दरम्यान, आंदोलनाची पूर्वकल्पना म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या आंदोलनासाठी सयाजी गायकवाड, आसाराम सातपुते, जगन्नाथ गुंजाळ, हिरामण गायकवाड, आसाराम बर्डे, बारीकराव गायकवाड आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *