यल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयोग चर्चेत; फळबागा, झाडे आणि भूजल संवर्धनासाठी प्रभावी संकल्पना
पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवा -ॲड. गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाढते हवामान बदल, अनियमित पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि भूजल पातळीतील घट यामुळे शेती व पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत शहरातील पर्यावरणप्रेमी व पीपल्स हेल्पलाइनचे ॲड. कारभारी गवळी यांनी स्वतःच्या घराच्या परिसरातील जिवन धनराई टिकवून ठेवण्यासाठी आणि झाडांना वर्षभर पुरेसा ओलावा मिळावा यासाठी ‘रेन गेन बॅटरी’ या अभिनव जलसंधारण प्रयोगाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. हवामानातील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग शेतकरी, फळबाग उत्पादक आणि पर्यावरणप्रेमींसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
यंदाचा पावसाळा जवळ आला असला तरी हवामानाचा बदलता स्वभाव चिंतेचा विषय ठरत आहे. कधी अतिवृष्टी, कधी पावसाचा मोठा खंड, तर कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने पावसाचे पाणी साठविणे आणि त्याचा योग्य वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने पीपल्स हेल्पलाइनच्या माध्यमातून ‘रेन गेन बॅटरी’ ही संकल्पना समाजासमोर मांडण्यात आली आहे.
ॲड. गवळी यांनी सांगितले की, रेन गेन बॅटरी ही निसर्गाच्या कार्यपद्धतीशी सुसंगत असलेली जलसंवर्धन प्रणाली आहे. परिपक्व झाडांच्या किंवा फळझाडांच्या परिसरात आयताकृती खंदक तयार करून त्यामध्ये दगड, गोटे आणि पाणी झिरपण्यास मदत करणारे साहित्य भरले जाते. पावसाचे पाणी या खंदकात साठते आणि गुरुत्वाकर्षण, मातीतील केशवाहिनी क्रिया तसेच झाडांच्या मुळांच्या नैसर्गिक जाळ्याद्वारे जमिनीत खोलवर मुरते. त्यामुळे झाडांच्या परिसरात दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो. विशेष म्हणजे हा ओलावा केवळ एका झाडापुरता मर्यादित राहत नाही. तो आसपासच्या जमिनीमध्ये पसरून सूक्ष्मजीव, वनस्पती, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण जैवविविधतेला आधार देतो. परिणामी, पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते.
सामान्यतः पावसाचे पाणी जमिनीवर साचून राहिल्यास उन्हामुळे त्याचे बाष्पीभवन होते. तसेच मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाऊन मातीची धूप होते. रेन गेन बॅटरीमुळे पाणी थेट जमिनीत मुरते. त्यामुळे बाष्पीभवनामुळे होणारा अपव्यय कमी होतो आणि पाणी वाहून जाण्याचे प्रमाणही घटते. या प्रक्रियेमुळे जमिनीखाली नैसर्गिक जलसाठा निर्माण होतो. पावसाळ्यानंतरही झाडांच्या मुळांना आवश्यक ओलावा मिळत राहतो. परिणामी, उन्हाळ्यातील ताण कमी होऊन झाडांची वाढ चांगली होते.
डाळिंब, आंबा, चिंच, सीताफळ, आवळा, मोसंबी, लिंबू, पेरू यांसारख्या फळझाडांसाठी रेन गेन बॅटरी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक झाडाजवळ अशी व्यवस्था उभारल्यास पावसाळ्यानंतरही मुळांना आवश्यक आर्द्रता उपलब्ध राहते. एल निनो आणि ला निना यांसारख्या जागतिक हवामान घटनांमुळे पावसाचे प्रमाण व वितरण अनिश्चित होत असताना रेन गेन बॅटरी स्थानिक पातळीवर प्रभावी उपाय ठरू शकते. पाऊस जास्त पडल्यास पाणी वाहून जाण्यापासून रोखले जाते, तर पावसाचा खंड पडल्यास जमिनीत साठलेला ओलावा झाडांना आधार देतो.
पीपल्स हेल्पलाइनने शेतकरी, नागरिक आणि युवकांना या पावसाळ्यात “प्रत्येक महत्त्वाच्या झाडाजवळ एक रेन गेन बॅटरी” उभारण्याचे आवाहन केले आहे. गावागावांत श्रमदानातून हा उपक्रम राबविला, तर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर जमिनीत साठविता येईल आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ॲड. कारभारी गवळी म्हणाले, “झाड वाचवणे म्हणजे केवळ एक झाड वाचवणे नव्हे, तर माती, पाणी, पक्षी, प्राणी, जैवविविधता आणि पुढील पिढीचे भविष्य वाचवणे होय. पावसाचा प्रत्येक थेंब ही निसर्गाची कार्यशक्ती आहे. त्याचा लोककल्याणासाठी वापर केला, तर खरी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रेन गेन बॅटरी ही केवळ जलसंधारण योजना नसून निसर्गाशी केलेली लोककल्याणकारी भागीदारी आहे.”
अहिल्यानगरमध्ये या संकल्पनेचे प्रत्यक्ष काम सुरू झाले असून माती, मुळे आणि श्रमदान यांच्या साक्षीने हा उपक्रम आकार घेत आहे. आता तो प्रत्येक गावात, प्रत्येक शेतात आणि प्रत्येक फळबागेत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर चांदणे, पोपट भोसले आणि प्रकाश शिंदे उपस्थित होते.

