• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर ते पंढरपूर दिंडीत 30 वृक्षांची लागवड; चंद्रभागेच्या तीरावर वृक्षारोपणाने अभियानाचा समारोप

ByMirror

Jul 27, 2026
वारीतून हरित क्रांतीचा संदेश; प्रत्येक मुक्कामात रुजवली पर्यावरणाची बीजे

वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहभागातून ‘एक गाव, एक झाड’ उपक्रम यशस्वी; लतिकाताई पवार यांचा पुढाकार


वारीतून हरित क्रांतीचा संदेश; प्रत्येक मुक्कामात रुजवली पर्यावरणाची बीजे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकात्मतेचा महासोहळा. याच पवित्र वारीच्या माध्यमातून यंदा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “रोज एक गाव, एक झाड” हा अभिनव संकल्प राबविण्यात आला. शहरातील सावेडीगाव येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करून भक्ती आणि पर्यावरण संरक्षणाचा अनोखा संगम साधण्यात आला. अखेरीस पंढरपूर येथील पवित्र चंद्रभागा नदीच्या तीरावर वृक्षारोपण करून या हरित अभियानाचा समारोप करण्यात आला.


ह.भ.प. चंद्रकांत महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या दिंडीत लिनेस क्लब व निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हाध्यक्षा लतिकाताई पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. संपूर्ण दिंडी मार्गावर तब्बल 30 वृक्षांची लागवड करण्यात आली. पारंपरिक भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही दिंडी यंदा विशेष ठरली.


दिंडीचा प्रारंभ साकत येथे श्री बाजीराव गायकवाड यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करून करण्यात आला. त्यानंतर घोगरगाव, बाभुळगाव, चापडगाव, करमाळा, शेलगाव, टेंभुर्णी, करकंब वस्ती तसेच पंढरपूर दशमी येथील मुक्कामांच्या ठिकाणी वाडी-वस्ती, सार्वजनिक जागा आणि शेतीच्या बांधांवर वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रत्येक गावातील भाविक, ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिले.
विशेष म्हणजे लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी त्या-त्या गावातील दिंडीचे स्वागत करणाऱ्या भाविकांनी स्वीकारली आहे. त्यामुळे ही झाडे केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित न राहता भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करणारी जिवंत स्मृती ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.


दिंडीचा प्रवास जसा विठ्ठल भक्तीचा आहे, तसाच तो समाजप्रबोधनाचा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नगरसेवक तथा राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी विविध देशी प्रजातींची तसेच फळझाडांची रोपे उपलब्ध करून दिली. स्थानिक हवामानाशी सुसंगत असलेल्या वृक्षांची लागवड झाल्याने त्यांच्या संवर्धनाची शक्यता अधिक असल्याचेही सांगण्यात आले.


या अभियानात ह.भ.प. चंद्रकांत महाराज बारस्कर, ह.भ.प. लताताई महाराज बारस्कर, सामाजिक प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हाध्यक्षा लतिकाताई पवार, कार्याध्यक्षा छायाताई राजपूत, अशोक वाकळे, बाळासाहेब वाकळे, देवीदास बारस्कर, तुकाराम बारस्कर, राजेंद्र बारस्कर, सुषमा दंडवते, पुष्पा वाकळे, मंदा वाकळे, शांता गाडे, गंगू वाघ, अलका गाडे, शरद देशपांडे, संपत बारस्कर, संगीता देव्हारे यांच्यासह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


ह.भ.प. चंद्रकांत महाराज बारस्कर म्हणाले की, “संत परंपरेने आपल्याला सर्व जीवमात्रांवर प्रेम करायला शिकवले आहे. वृक्ष हे निसर्गाचे प्राण आहेत. विठ्ठल भक्ती करताना पर्यावरणाचे रक्षण करणे हेही आपले कर्तव्य आहे. आपण लावलेले प्रत्येक झाड भविष्यात अनेकांना सावली, प्राणवायू आणि जीवन देणार आहे. त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे ही खरी सेवा आहे. वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नसून समाजाला चांगल्या विचारांची दिशा देणारी संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.


लतिकाताई पवार म्हणाल्या की, हवामान बदल, वाढते तापमान आणि पर्यावरणीय संकटांच्या पार्श्‍वभूमीवर वृक्षसंवर्धन ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून अस्तित्वाची गरज बनली आहे. वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण व्हावे आणि प्रत्येक गावात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. वृक्ष लावणे ही सुरुवात आहे; परंतु त्यांचे संगोपन करणे ही खरी पर्यावरण सेवा आहे. भविष्यातही अशा हरित उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *