• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रपती पदकप्राप्त पोलिसाविरुद्ध तक्रार करणारा आता मोक्कातील फरार आरोपी

ByMirror

Jul 27, 2026
तक्रारीनंतर निलंबित झालेल्या पोलिसाच्या प्रकरणाला नवे वळण

गजानन ॲग्रो संचालकासह आठ जणांवर कारवाई


रेशनिंगच्या तांदळाच्या काळाबाजारातून मोक्कापर्यंत! संजय अग्रवाल याच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप


तक्रारीनंतर निलंबित झालेल्या पोलिसाच्या प्रकरणाला नवे वळण


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या अंत्योदय योजनेअंतर्गत गोरगरीब लाभार्थ्यांसाठी मोफत वितरित करण्यात येणाऱ्या रेशनिंगच्या तांदळाच्या कथित काळाबाजार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात तांदूळ खरेदी केल्याचा आरोप असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील गजानन ॲग्रो कंपनीचे संचालक संजय अग्रवाल यांच्यासह आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोक्कातील आरोपी असलेला संजय अग्रवाल याने यापूर्वी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पदकप्राप्त अधिकारी राजेंद्र वाघ यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर वाघ यांच्यावर कारवाई झाली होती. आता त्याच तक्रारदारावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


या आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली असून संजय अग्रवाल यांच्यासह पाच आरोपी अद्याप फरार आहेत. जिन्सी पोलीस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात संदीप विश्‍वनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. तपासात संघटित पद्धतीने शासकीय रेशनिंगचा तांदूळ खरेदी करून त्याची अवैध विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकरणाची पार्श्‍वभूमी 17 नोव्हेंबर 2025 रोजीच्या कारवाईशी संबंधित आहे. त्यावेळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, एपीआय अमोल पवार आणि त्यांच्या पथकाने नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे छापा टाकला होता. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आल्याचे समोर आले होते.


पोलिसांनी गोडाऊनची पाहणी केली असता 50 किलो वजनाच्या तब्बल 450 तांदळाच्या गोण्या, अंदाजे 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पंचनामा करून तांदूळ ताब्यात घेण्यात आला. चौकशीदरम्यान संबंधित तांदळाच्या खरेदी-विक्रीची कोणतीही वैध बिले किंवा कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान हा तांदूळ छत्रपती संभाजीनगर येथील गजानन ॲग्रो कंपनीचे संचालक संजय अग्रवाल यांच्याकडे विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच यापूर्वीही अशाच प्रकारचे व्यवहार झाल्याची माहिती उपलब्ध झाल्याने अग्रवाल यांचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले होते.


या कारवाईनंतर सुमारे दोन महिन्यांनी संजय अग्रवाल यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्याविरोधात तक्रार केली. या तक्रारीत खोट्या गुन्ह्यात नाव टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राजेंद्र वाघ यांच्यावर कारवाई झाली. आता मात्र याच संजय अग्रवाल यांच्यासह आठ जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने तपासाचे स्वरूप अधिक गंभीर झाले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या गुन्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *