विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती
शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पेन्शनरांची होणार एकजूट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त कर्मचारी व पेन्शनरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या वतीने शहरात ‘संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. 13 जून रोजी टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे हा मेळावा संपन्न होणार असून, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हाभरातील हजारो पेन्शनर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेन्शनरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर न्याय मिळावा, त्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जावे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस भूमिका निश्चित व्हावी, हा या संकल्प मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील निवृत्त कर्मचारी, शिक्षक, अधिकारी तसेच महिला पेन्शनर मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष द. मा. ठुबे गुरुजी, कार्याध्यक्ष रावसाहेब पवार, सरचिटणीस बन्सी उबाळे यांनी केले आहे. पेन्शनरांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना एकत्रितपणे आवाज देण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या मेळाव्यास जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचे आमदारही उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये आमदार संग्राम जगताप, आशुतोष काळे, मोनिकाताई राजळे, काशिनाथ दाते, सत्यजित तांबे, डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, विक्रमसिंह पाचपुते आणि विठ्ठलराव लंघे यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे तसेच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचीदेखील उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे पेन्शनरांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.
मेळाव्यादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. राहुरी-नगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले, विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे व विवेक कोल्हे तसेच नागपूर विद्यापीठ सदस्य राजेश परजणे यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पेन्शनरांच्या विविध मागण्या, निवृत्तीनंतरच्या सुविधा, आरोग्यविषयक प्रश्न, आर्थिक लाभ तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत चर्चा करून त्यासंदर्भातील निवेदने संबंधित मान्यवरांना सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा मेळावा केवळ स्नेहसंमेलन न राहता पेन्शनरांच्या हक्कांसाठीचा प्रभावी संवाद मंच ठरणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशन जिल्हा कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
