• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

ByMirror

Jun 1, 2026
विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन


अनिष्ट प्रथांना छेद देत अहिल्यादेवींनी उभारले आदर्श राज्यकारभार -अतुल फलके

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाउंडेशन ट्रस्ट आणि भुसारे कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची माहिती देऊन त्यांच्या विचारांचा आदर्श अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला व कर्तृत्वाला उजाळा देत समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, भुसारे कोचिंग क्लासेसच्या संचालिका सुषमा भुसारे, युवराज भुसारे, बाळू डोंगरे, जयसिंग गायकवाड यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अतुल फलके म्हणाले की, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातील अनेक अनिष्ट प्रथा, रूढी आणि परंपरांना धैर्याने छेद देत लोककल्याणकारी राज्याची निर्मिती केली. महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. राज्यकारभार करताना त्यांनी जनतेच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले. त्यांच्या प्रशासनात न्याय, पारदर्शकता आणि लोकहिताला सर्वोच्च महत्त्व होते.


ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, नदीघाट बांधले, धर्मशाळा उभारल्या आणि जनतेच्या सोयीसाठी विविध विकासकामे केली. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.


सुषमा भुसारे यांनी सांगितले की, समाजहितासाठी परिवर्तन घडवून आणण्यात अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील जुनाट आणि अनिष्ट रूढी-परंपरांना फाटा देत स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग त्यांनी दाखवून दिला. त्यामुळेच त्या आजही महिला सक्षमीकरणाच्या प्रेरणास्थान मानल्या जातात.


कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांची माहिती देण्यात आली. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवा यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. उपस्थितांनी अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *