• Wed. Jun 3rd, 2026

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त हरदिनचे वृक्षारोपण

ByMirror

Jun 2, 2026

ह.भ.प. पूजाताई आळकुटे-माने यांना कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार प्रदान


अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, धर्मनिष्ठा आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श निर्माण केला -संजय सपकाळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच अध्यात्म, समाजप्रबोधन आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ह.भ.प. पूजाताई आळकुटे-माने यांना ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात छावणी परिषदेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके यांच्या सेवानिवृत्तीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, विजय माने, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, माधवी माळगे, मीनाताई परदेशी, रजनी ताई परदेशी, प्रांजली सपकाळ, शितलताई भापसे, जहीर सय्यद, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, अशोक पराते, ताराचंद ठोकळ, अनिल हळगावकर, अभिजीत सपकाळ, जालिंदर आळकुटे, मुन्ना वाघस्कर, निजाम पठाण, नवनाथ वेताळ, विलास आहेर, मनोहर दरवडे, ओम माळगे, सुधीर कपाळे, दीपक घोडके, अविनाश जाधव, अविनाश पोतदार, शेषराव पालवे, रामनाथ गर्जे, सरदारसिंग परदेशी, राजू जंगम, शशिकांत पवार, दशरथ मुंडे, योगेश चौधरी, कुमार धतुरे, प्रकाश देवळालीकर, विनोद खोत, दीपक बडदे, सुनील बग्गन, विशाल भामरे, नवनाथ खराडे, बाळासाहेब धाडगे, विजय महाजन, सेंट्रल बँकेचे अमित देशमुख, शितल भापसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना संजय सपकाळ यांनी सांगितले की, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ एका राज्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रेरणास्थान आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आदर्श राज्यकारभार उभा करून न्याय, धर्मनिष्ठा आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य केल्यास त्या सर्वोच्च यश संपादन करू शकतात, हे अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. आजच्या काळात महिलांचे योगदान प्रत्येक क्षेत्रात वाढत असून त्यांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्या भावनेतून दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.


छावणी परिषदेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके यांनी सांगितले की, विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या महिलांना अशा पुरस्कारांमुळे नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क उभारणी व संवर्धनात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या ग्रुपने उद्यान परिसर विकसित करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे.


ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे म्हणाले की, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्व, न्यायप्रियता आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक होत्या. त्यांनी राज्यकारभार करताना जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, पाणवठ्यांची निर्मिती, धर्मशाळा उभारणी आणि वृक्षारोपण यांसारखी अनेक लोकहिताची कामे त्यांनी केली. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम हरदिन मॉर्निंग ग्रुप करत असून समाजासाठी हा आदर्श उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
सचिन चोपडा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अहिल्यादेवींची कीर्ती त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण देशभर पसरली. त्यांनी धर्म, समाज आणि संस्कृतीचे जतन करत अनेक लोकहिताची कामे उभी केली. त्यांच्या कार्याची दखल तत्कालीन ब्रिटिशांनीही घेतली होती. अहिल्यानगर शहराला त्यांचे नाव मिळाल्याने नागरिकांना प्रेरणा आणि अभिमानाची जाणीव निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.


समाजात जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा करणारी माणसे घडली पाहिजेत. अहिल्यादेवींच्या कार्यातून आपल्याला लोकसेवा, करुणा, न्याय आणि विकासाचा संदेश मिळतो. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हरदिनचे कार्य सुरु राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *