• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

भटक्या विमुक्त समाज संघटनेतर्फे राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी

ByMirror

Jun 27, 2026

छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्धार

जातीभेद नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा जपणे प्रत्येकाची जबाबदारी -राजाभाऊ वाडेकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयतेचे राजे, सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अहिल्यानगर शहर भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्याला उजाळा देण्यात आला.
प्रारंभी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष यांच्या राजाभाऊ वाडेकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्‍वर भांगे, भाऊ वर्धेकर, निलेश चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.


राजाभाऊ वाडेकर म्हणाले की, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण, बहुजन कल्याण आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली व्हावीत आणि जातीभेद नष्ट व्हावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.”


ते पुढे म्हणाले की, भटक्या-विमुक्त समाजासह सर्व वंचित घटकांनी शिक्षण, संघटन आणि सामाजिक एकतेच्या बळावर पुढे यावे. शाहू महाराजांनी दाखविलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या मार्गावर चालत समाजातील विषमता दूर करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *