• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

नागापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चाँद शेख यांना ‘शिक्षण गौरव’ पुरस्कार प्रदान

ByMirror

May 25, 2026
भीमथडी मराठी साहित्य संमेलनात महादेव जानकर व फ. मु. शिंदे यांच्या हस्ते गौरव

भीमथडी मराठी साहित्य संमेलनात महादेव जानकर व फ. मु. शिंदे यांच्या हस्ते गौरव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलनात “शिक्षण गौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शिक्षणसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.


भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने चौफुला केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आणि ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे यांच्या हस्ते चाँद शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाचे उद्घाटक आमदार राहुल कुल, संमेलनाचे मुख्य संयोजक दशरथ यादव, प्रमुख पाहुणे पै. नाना डोंगरे, संजय सोनवणे, दिपक पवार यांच्यासह राज्यभरातील साहित्यिक, कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असावे, या विचारातून त्यांनी सातत्याने काम केले आहे.


शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी ज्या-ज्या गावांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्या ठिकाणी लोकसहभागातून शाळा विकासाची चळवळ उभी केली. किन्ही (पारनेर), दरेवाडी (नगर), हिवरेझरे (नगर), कनोली (संगमनेर), नाचनगाव (अकोले) आणि नवनागापूर (नगर) येथील शाळांच्या इमारती उभारण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


विशेष म्हणजे चाँद शेख हे उत्कृष्ट पोवाडा गायक म्हणूनही परिचित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच विविध महापुरुषांच्या कार्यावर आधारित पोवाडे सादर करून ते इतिहास आणि संस्कृती जतनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या प्रभावी गायनातून युवकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा जागृतीचे कार्य ते करत आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलनात “शिक्षण गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *