अहिल्यानगरमध्ये आठव्या पर्वाचे उद्घाटन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन, अहिल्यानगर, फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लब आणि फर्नांडिस परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ॲलेक्स फर्नांडिस कप 2026” फुटबॉल स्पर्धेला भुईकोट किल्ला मैदानावर उत्साहात प्रारंभ झाले. स्पर्धेचे हे 8 वे वर्ष असून, यामध्ये जिल्ह्यातील 10 संघांनी सहभाग नोंदवला आहे.
ही स्पर्धा नॉकआऊट पद्धतीने खेळवली जाणार आहे. फुटबॉलचा हा थरार पुढील आठ दिवस रंगणार असून, अंतिम फेरीपर्यंत स्पर्धा अधिकच रोमांचक होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा फुटबॉल संघटनेचे सहसचिव प्रदीप जाधव यांच्या हस्ते सलामीचा सामना लावून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा फुटबॉल संघटनेचे सदस्य राजू पाटोळे, पल्लवी सैंदाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, अमरजीतसिंह शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपालसिंह परमार, सहखजिनदार रणबीरसिंह परमार, सदस्य राजू पाटोळे, अभिषेक सोनावणे, अभय साळवे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ॲलेक्स फर्नांडिस हे अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना ज्याची स्थापना 1972 साली झाली. त्याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. ॲलेक्स फर्नांडिस यांनी अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव म्हणून तब्बल 36 वर्षे आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ( महाराष्ट्र राज्य संघटना) उपाध्यक्ष आणि खजिनदार म्हणून 20 वर्षे कामकाज सांभाळले आणि जिल्ह्यातील फुटबॉल खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी सहसचिव प्रदीप जाधव म्हणाले की, “ अहिल्यानगर जिल्ह्यात फुटबॉलची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी ‘ॲलेक्स फर्नांडिस कप’ ही स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना एक समान व्यासपीठ मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. सर्व संघांनी खेळाडूवृत्ती जपून उत्कृष्ट खेळ सादर करावा आणि स्पर्धा यशस्वी व्हावी, हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धा यशस्वी पार पडावी यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबचे जेव्हिअर स्वामी, राजेश अँथोनी, सचिन पाठारे, मयूर गोरखा, शुभम शिवानंद, जोएल पठारे, साहिल कुसळकर, उत्कर्ष सोनवणे परिश्रम घेत आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षिस वितरण सोहळा 9 मे रोजी पार पडणार आहे. जिल्ह्यातील सर्व फुटबॉल प्रेमींनी स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती नोंदवून खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन संयोजक समितीद्वारे करण्यात आले आहे.
–—
रंगतदार सलामीचे सामने
सलामीचा सामना फिरोदिया शिवाजीयन्स क्लब विरुध्द सॉकर स्कूल यांच्यात झाला. यामध्ये 2-0 गोलने फिरोदिया शिवाजीयन्स क्लब विजेता ठरला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही.
फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी विरुध्द युनिटी फुटबॉल क्लब यांच्यात झालेल्या सामना शेवट पर्यंत रंगतदार व अनिर्णित राहिला. शेवटी पेनल्टी शॉटवर 3-2 गोलने फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीने विजय संपादन केले.
