आनंदऋषीजी नेत्रालयात मोफत बाल नेत्रतपासणी व तिरळेपणा उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बाल दृष्टीदोष निर्मूलनासाठी पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी महिनाभर चालणार शिबिर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांना नवजीवन देण्याबरोबरच दृष्टीदोषामुळे अंधारलेल्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसाठी येथील नेत्रालय मोठा आधार ठरत असून, आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये या उद्देशाने सेवाभावातून रुग्णसेवा सुरू आहे. अनुभवी तज्ञ डॉक्टरांच्या योगदानामुळे हे हॉस्पिटल मानवसेवेचे प्रभावी केंद्र बनले आहे. भावी पिढीतील दृष्टीदोष दूर करण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन मंगलाताई रुणवाल यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालय येथे संथाराव्रतधारी श्रीमती पानाबाई लक्ष्मीचंदजी रुणवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजय रुणवाल, सतीश रुणवाल व मंगल रुणवाल परिवार (विजापूर/पुणे) यांच्या वतीने आयोजित मोफत बाल नेत्रतपासणी व तिरळेपणा उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्मितेश रुणवाल, सतीश रुणवाल, प्रेमभाऊ बोथरा, मनिषा बोथरा, संतोष बोथरा, संगीता बोथरा, सतीश बोथरा, प्रतिभा बोथरा, गौरव बोथरा, रोहन बोथरा, डॉ. अशोक महाडिक, बाल नेत्ररोग तज्ञ डॉ. निरंजन पेहेरे, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, श्याम चोरडिया, माणकचंद कटारिया, रवींद्र भंडारी, प्रकाश छल्लाणी आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून आनंदऋषीजी नेत्रालयात हजारो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. लहान मुलांमधील दृष्टीदोष निर्मूलनासाठी नेत्रालयाने पुढाकार घेतला असून, वाढत्या डोळ्यांच्या समस्या वेळेवर लक्षात येत नाहीत. त्यामुळे पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. मनपा व जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यात येत असून, निवडक मुलांवर उन्हाळी सुट्टीत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभही दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रेमभाऊ बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये ‘दवा’सोबत ‘दुवा’ मिळत असल्याने संपूर्ण देशभर हॉस्पिटलची ख्याती पसरली आहे. गोरगरिबांना उपचाराची संधी उपलब्ध करून देत असताना तज्ञ डॉक्टरांचेही मोलाचे योगदान मिळत आहे. दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू असून, सक्षम भावी पिढी घडविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आनंद छाजेड यांनी सांगितले की, लहान मुलांमध्ये वाढत्या नेत्र समस्यांच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर महिनाभर सुरू राहणार आहे. बाल नेत्ररोग तज्ञ डॉ. निरंजन पेहेरे हे तिरळेपणा व इतर नेत्र विकारांवरील उपचारासाठी उपलब्ध आहेत. ते जिल्ह्याचे सुपूत्र असून, हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट, हैद्राबाद मध्ये गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत होते व आता पूर्ण वेळ आनंदऋषिजी नेत्रालय येथे सेवा देत आहेत. आफ्रिका, युरोप आणि अमेरिका येथेही त्यांनी काम केले असून, तिरळेपणा उपचारात विशेष प्राविण्य मिळवले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठ्या शहरांमधील रुग्णदेखील येथे उपचारासाठी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. निरंजन पेहेरे यांनी सांगितले की, नेत्र विकार लहान वयात ओळखून योग्य उपचार केल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. लहान मुलांना त्यांच्या दृष्टीदोषाची जाणीव होत नसल्याने पालकांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तिरळेपणा ही एकप्रकारची अपंगत्वाची स्थिती असून, यामुळे आत्मविश्वास कमी होतो तसेच करिअर व वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. थ्री-डी व्हिजनवरही परिणाम होतो. मात्र योग्य वेळी उपचार केल्यास हे दोष पूर्णपणे दूर करता येतात. आनंदऋषी नेत्रालयात या सर्व उपचारांची सुविधा उपलब्ध असून, पालकांनी मुलांच्या दृष्टीदोषाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात डॉ. कौस्तुभ घोडके, डॉ नचिकेत पारगावकर, डॉ कुशल शहा , डॉ किरण ढेरे, डॉ ऋषिकेश डेरे, डॉ सारडा यांनी देखील नेत्र तपासणी केली. शिबिरात तीनशे पेक्षा अधिक बालकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, तिरळेपणावर आवश्यक त्या शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत.
–—
गुरु-शिष्याच्या भेटीने रंगला भावनिक क्षण
बाल नेत्ररोग तज्ञ डॉ. निरंजन पेहेरे यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारा भावनिक प्रसंग शिबिरात घडला. त्यांच्या रेसिडेन्शीअल विद्यालयातील शिक्षिका मंगला तवले यांनी पेपरमध्ये शिबिराची जाहिरात पाहून खास त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थिती लावली. दहावी बोर्डाच्या परीक्षेत गुणवंत ठरलेला हा विद्यार्थी आज यशस्वी डॉक्टर झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. अचानक झालेल्या या भेटीने डॉ. पेहेरे यांनीही आनंद व्यक्त केला. या गुरु-शिष्याच्या भेटीने उपस्थितांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.
