• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

सोमवारी अहिल्यानगरच्या रंगभूमीवर ‘ॲनिमल’चा थरार

ByMirror

May 2, 2026
सोमवारी अहिल्यानगरच्या रंगभूमीवर ‘ॲनिमल’चा थरार

प्रमुख भूमिका असलेल्या सिद्धार्थ जाधवचा अभिनय पाहण्याची संधी


‘दत्तू’च्या स्वप्नांची कहाणी; संघर्ष, भावना आणि वास्तवाचा प्रवास

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नाट्यप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणार असून कबीर इव्हेंट्‌सच्या वतीने सोमवार, 4 मे रोजी रात्री 8:30 वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात ‘ॲनिमल’ या बहुचर्चित मराठी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.


अश्‍वमी थिएटर्स निर्मित या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे सिद्धार्थ जाधव हेच निर्माते असून, नाटकाचे लेखन व दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. ‘ॲनिमल’ हे नाटक एका गावातून मुंबईत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या ‘दत्तू’च्या संघर्षमय प्रवासाची कथा मांडते. या नाट्यातून त्याच्या भावविश्‍वातील निरागसता, स्वप्नं, अपयश आणि वास्तवाचा सामना प्रभावीपणे उलगडतो. मराठी रंगभूमीवरील एकपात्री परंपरेला नवा आयाम देणारे हे नाटक प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारे ठरणार आहे. नाटकात केवळ संवादच नव्हे, तर नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि मूक पात्रांच्या माध्यमातून कथानक अधिक जिवंत करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, ‘दत्तू’च्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव यांचा अभिनय प्रेक्षकांना थेट मनाला भिडणारा ठरतो. त्याच्या स्वप्नांचा प्रवास, त्यातील चढ-उतार आणि शेवटचा भावनिक टप्पा प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा आहे. या नाटकाच्या माध्यमातून ‘स्ट्रगलर’च्या जीवनातील वास्तव, संघर्ष आणि अपूर्ण स्वप्नांची वेदना अधोरेखित केली जाते. त्यामुळेच हे नाटक केवळ मनोरंजन न राहता एक विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरतो.


नाट्यप्रेमींनी या अनोख्या रंगमंचीय प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तिकीट रविवारी व सोमवारी दिवसभर सभागृहात उपलब्ध असणार आहे. तसेच 9850192345 या मोबाईलवर संपर्क करुन बुकिंग करता येणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *