4 मे रोजी होणार उद्घाटन
खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती व कबड्डी या खेळांच्या अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी 20 दिवसांचे प्राथमिक व अद्ययावत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती व कबड्डी खेळासाठी दोन टप्प्यात सदर प्रशिक्षण शिबिर होणार असून, पहिला टप्पा 4 ते 13 मे आणि दुसरा टप्पा 18 मे ते 27 मे दरम्यान होणार आहे. यामध्ये अधिकाधिक खेळाडूंनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात खेळाचा प्रचार, प्रसार होऊन खेळाडूंची संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, तसेच शहरी व गावपातळीवर चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी 8 ते 14 वयोगटातील व वरिष्ठ गटात सकाळी 6 ते 8.30 व सायंकाळी 5 ते 7.30 या वेळेत शिबिराचे आयोजन केले आहे. खो-खो खेळाचे शिबिर बाणेश्वर क्रीडा मंडळ, बुऱ्हाणनगर व आबासाहेब काकडे विद्यालय, निर्मलनगर, शेवगाव येथे होणार आहे. बॅडमिंटन व कबड्डी खेळासाठी जिल्हा क्रीडा संकुल, अहिल्यानगर येथे शिबिर होईल. संभाजी राजे कुस्ती केंद्र सावेडी, तालुका क्रीडा संकुल बुऱ्हाणनगर येथे कुस्तीचे शिबिर होणार आहे.
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक व अद्ययावत प्रशिक्षण शिबिरात खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती व कबड्डी या खेळांच्या अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
