• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

सन फार्मा विद्यालयात आरएसपी विद्यार्थ्यांना अग्निशमनाचे प्रशिक्षण

ByMirror

Apr 25, 2026
सन फार्मा विद्यालयात आरएसपी विद्यार्थ्यांना अग्निशमनाचे प्रशिक्षण

प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दलाच्या कार्याचे धडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पोलीस गृह विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा आणि नागरी संरक्षण या विषयांतर्गत नागापूर येथील सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आर.एस.पी. (राष्ट्र विद्यार्थी पोलिस) विद्यार्थ्यांसाठी विशेष अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आग विझविण्याचे प्रत्यक्ष धडे देत आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते तापमान आणि बदलते वातावरण यामुळे विविध प्रकारच्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सध्या 38 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणाऱ्या तापमानामुळे इलेक्ट्रिक वाहनांना आग लागणे, माळरान व डोंगर पेट घेणे, घरगुती विजेच्या शॉर्टसर्किटमुळे किंवा गॅस गळतीमुळे लागणाऱ्या आगी अशा घटना वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आग लागल्यास योग्य उपाययोजना करून ती कशी नियंत्रणात आणावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.


महानगरपालिका अग्निशामक दलाचे अधिकारी शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक बंबाच्या साहाय्याने विविध प्रकारच्या आगी विझविण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच विजेचे शॉर्टसर्किट झाल्यास घ्यावयाची खबरदारी, पावसाळ्यात पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना कशी मदत करावी, उंच इमारतींमध्ये आग लागल्यास लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे तंत्र याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.


या प्रात्यक्षिकामध्ये अग्निशामक दलाचे कर्मचारी शिवदास वांढेकर, सुरज पोकळे, भारत पाडगे, सिद्धार्थ खरात, मयूर लांडगे, अमोल ढमाले, आतेष भापकर, प्रभात साठे आणि नागनाथ नाईक यांनी सक्रिय सहभाग घेत आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना प्रत्यक्ष करून दाखवल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आर.एस.पी. अधिकारी राजेंद्र धस व शंकर बारस्कर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी अरुण ससे, मंगेश निकम, वैभव काळे, रवींद्र गावडे आणि गुंजाळ मॅडम यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या शेवटी आर.एस.पी. अधिकारी राजेंद्र धस यांनी सर्व अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होऊन संकटसमयी धैर्याने व योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *