श्वसन विकार मोफत तपासणी शिबिराला रुग्णांचा प्रतिसाद; 75 रुग्णांची तपासणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला जात आहे. येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्याच्या जीवनातील वेदना दूर करण्याचे काम हे आरोग्य मंदिर करत आहे. देवाच्या कृपेने या आरोग्य सेवेच्या कार्यात कटारिया परिवाराची दुसरी पिढी देखील डॉक्टरच्या रुपाने जोडली गेली आहे. या सेवा कार्यात योगदान देत असल्याचा संपूर्ण परिवाराला अभिमान असल्याचे डॉ. प्रतिक कटारिया यांनी सांगितले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमती रिमलबाई शांतीलाल कटारिया यांच्या स्मरणार्थ डॉ. वसंत कटारिया परिवाराच्या वतीने आयोजित श्वसन विकार मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. प्रतिक कटारिया बोलत होते. यावेळी डॉ. वसंत कटारिया, डॉ. अनिकेत कटारिया, लता कटारिया, प्रज्ञा कटारिया, हर्षदा कटारिया, मनीष लोढा, संतोष बोथरा, सतीश लोढा, डॉ. प्रकाश कांकरिया, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लाणी, सुभाष मुनोत, श्वसन विकार तज्ञ डॉ. स्नेहा तिरपुडे व डॉ. प्रणाली त्रिमुखे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये डॉ. वसंत कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्डियाक सेंटर सुरू करण्यात आले. त्यांनी आपल्या तिसऱ्या अपत्याप्रमाणे त्याचा सांभाळ करून त्याला मोठे केले. आज त्यांनी 25 हजार पेक्षा जास्त बायपास सर्जरी यशस्वीरित्या केले. पूर्वी ह्रद्याच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या शहरात जावे लागायचे. सेटअप नसताना सेवाभावाने हा प्रकल्प उभारण्यात आला, आज महाराष्ट्रातील एक अद्यावत सेंटर बनला असून, अनेक शहरातील रुग्ण याचा लाभ घेत आहे. कटारिया यांची दोन्ही मुले डॉक्टर असून, ते देखील या सेवा कार्यात जोडली गेली आहे. दोन्ही आपल्या क्षेत्रात निपुण आहे. त्यांचे सुना देखील या हॉस्पिटल कार्यात सेवा देत आहेत. याचप्रमाणे डॉ. प्रकाश कांकरिया परिवार देखील या सेवा कार्याशी जोडले गेलेले आहे. हे दोन्ही परिवाराची सोशल पार्टनर म्हणून हॉस्पिटलला साथ लाभली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. स्नेहा तिरपुडे व डॉ. प्रणाली त्रिमुखे यांनी फुफ्सांचे आजार विषयी उपचार पद्धती, दमाबद्दल समाजात गैरसमज यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाल्या की, कोविडनंतर फुफ्सांच्या आजाराची जागृती झाली, मात्र उपचाराची योग्य माहिती पोहोचल नाही. हे आजार बरे होतात, मात्र योग्य वेळी उपचार व निदान आवश्यक असल्याचे स्पष्ट करुन हॉस्पिटलमध्ये असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती त्यांनी दिली.
प्रज्ञा कटारिया म्हणाल्या की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो रुग्ण लाभ घेतात. सुपर स्पेशलिटी डॉक्टर 24 तास उपलब्ध असतात. 25 वर्षापासून आचार्यजींच्या आशीर्वादाने ही सेवा सुरू आहे. जैन सोशल फेडरेशन मानवतेच्या कार्यात मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात श्वसन विकार संबंधीत फुफ्साचे आजार, दमा, खोकला, ॲलर्जी इत्यादीसंबंधीत 75 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले तर आभार प्रकाश छल्लाणी, यांनी मानले.
