• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या इको क्लबची पर्यावरणपूरक मोहीम

ByMirror

Mar 7, 2026
“पर्यावरण रक्षण हीच खरी देशसेवा” -उल्हास दुगड

विद्यार्थ्यांनी शहरात हजारो मीटर ‘चायना नायलॉन मांजा’ गोळा केला


“पर्यावरण रक्षण हीच खरी देशसेवा” -उल्हास दुगड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मकर संक्रांतीनंतर पतंगोत्सवामुळे शहरातील झाडे, विद्युत तारा व रस्त्यांवर अडकून राहणारा ‘चायना नायलॉन मांजा’ पर्यावरणासाठी आणि पक्ष्यांसाठी घातक ठरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांनी शाळा परिसर तसेच आजूबाजूच्या भागातून तब्बल हजारो मीटर नायलॉन मांजा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली.


मकर संक्रांतीनंतर दरवर्षी पतंगोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा झाडांवर, रस्त्यांवर आणि विद्युत तारा यांवर अडकून राहतो. हा मांजा पक्षी, प्राणी तसेच नागरिकांसाठी गंभीर धोका निर्माण करतो. अनेकदा पक्ष्यांचे पंख किंवा मान कापल्याच्या घटना घडतात, तर दुचाकीस्वारांनाही अपघाताचा धोका निर्माण होतो. या धोक्याची जाणीव ठेवून इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवत झाडांवर अडकलेला व रस्त्यांवर विखुरलेला नायलॉन मांजा काळजीपूर्वक काढून सुरक्षितपणे जमा केला.


विद्यार्थ्यांनी गोळा केलेला हा मांजा पर्यावरण अभ्यासक व ‘निसर्ग मित्र’ अमित गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यानंतर या मांज्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे इको क्लब प्रमुख तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेचे पर्यावरण दूत सतिश गुगळे हे मागील सहा ते सात वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होत आहे. इको क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, पक्षीसंवर्धन, स्वच्छता मोहिमा यांसारखे विविध पर्यावरणपूरक उपक्रमही राबवले जातात.


या उपक्रमासाठी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, सौ. कल्पना पाठक तसेच वैभव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
प्राचार्य उल्हास दुगड म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची मोठी गरज असून, पर्यावरण रक्षण हीच खरी देशसेवा आहे. पतंगोत्सवानंतर नायलॉन मांज्यामुळे पक्ष्यांचे मोठे नुकसान होत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन हा मांजा गोळा करणे कौतुकास्पद उपक्रम आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली तर भविष्यात ते जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक बदल घडवू शकतील. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्वही अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले.


पर्यावरण दूत सतिश गुगळे म्हणाले की, नायलॉन मांजा हा पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असून तो सहजपणे नष्टही होत नाही. त्यामुळे तो पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहून अनेक जीवांसाठी धोका निर्माण करतो. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांनीही चायना मांजाचा वापर टाळून पर्यावरणपूरक दोऱ्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *